माथेरानच्या जंगलात डुप्लिकेट सर्पमित्रांची फुसफुस

By | September 27, 2017

वन्यजीवांच्या विविधतेसाठी माथेरान जंगल प्रसिद्ध आहे. साप, बेडूक आणि सरडय़ाच्या अनेक प्रजाती माथेरानाच्या जंगलात आढळतात ज्या इतरत्र आढळत नाहीत . हरणटोळ, ढोल मांजऱ्या, कोब्रा, नाग, पीट वायपर या सापांच्या प्रजाती या परिसरात सापडतात .

वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार कोणत्याही वन्यजीवांची तस्करी वा संबंधित विभागाच्या परवानगीशिवाय त्यांना हाताळणे कायदेशीर गुन्हा आहे. असे बरेच स्वयंघोषित संशोधक सर्पमित्राच्या नावाखाली सध्या सापांचे ‘हार्पिग’ करण्यासाठी जंगलात फिरत असल्याची माहिती आहे. अवैध हार्पिगसाठी मुंबई-पुण्याहून आलेले अतिउत्साही पर्यटक देखील सापांना हाताळत आहेत.

हार्पिग म्हणजे वनविभागाच्या परवानगीशिवाय जंगलात जाऊन सरपटणाऱ्या किंवा उभयचर प्राण्यांना हाताळणे, त्यांची वाहतूक करणे, त्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवासातून हलविणे म्हणजे हार्पिग करणे. पावसाळ्यात अनेक टोळ्या गटागटाने जंगलात अवैध हार्पिगसाठी जातात. अवैध हार्पिग हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा आहे.

ही अवैध हार्पिग थांबवण्यासाठी प्राणीमित्र प्रवीण गडवीर यांच्यासह १०१ स्थानिक प्राणीमित्र रात्रीच्या वेळी जंगलात पहारा देतात.सापांची मोठी किंमत बाजारात मिळते. त्यांना बाटलीबंद करून विकले जाते. काही दिवसांपूर्वी माथेरानच्या जंगलात असाच एक व्यक्ती नेरळमध्ये सापांची कमतरता आहे, असे सांगून हरणटोळ जातीचा साप बेकायदा पद्घतीने घेऊन जात होता. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार ‘शिकार’ म्हणजे केवळ एखाद्या प्राण्याला मारून टाकणे एवढेच मर्यादित नसून त्याची अवैध वाहतूक करणे, इजा पोहोचविणे, विनापरवानगी हाताळणे म्हणजेही शिकारच असल्याची माहिती ठाणे वनविभागाचे वन्यजीव संरक्षक पवन शर्मा यांनी दिली.

डुप्लिकेट सर्पमित्रांची फुसफुस थांबवण्यासाठी सर्व निसर्गप्रेमींनी एकत्र येण्याची गरज आहे हे मात्र नक्की

@@पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा @@