मुंबईत अजून जोरदार वादळी पावसाची शक्यता

By | September 19, 2017

सकाळपासून मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत ..

मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर उपनगरात दुपारपासून धुवाँधार पाऊस सुरु झाला. सायन, दादर, परळ, फोर्ट भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील 24 तास अशाच मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
29 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई थांबली होती. त्यादिवशी अनेक मुंबईकर पावसात अडकून पडले होते. त्यामुळे आज मुसळधार पावसाचा अंदाज पाहून अनेकजणांनी घरचा रस्ता धरला आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह दादर, लोअर परेल,वांद्रे रेल्वे स्टेशनवर चाकरमान्यांनी गर्दी केलीये. संध्याकाळची वेळ असल्यामुळे त्यातच आणखी गर्दी झालीये. तसंच पश्चिम महामार्ग आणि इस्टर्न एक्स्प्रेसवर आताच ट्रॅफिक जाम होण्यास सुरुवात झाल्याचे वृत्त आहे. वांद्रे, शीव, माटुंगा, दादर खोदादाद सर्कल, हिंदमाता, परेल आदी भागात ट्रॅफिक जाम झालीये.

समुद्रात 60 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहत, तुफानी लाटा निर्माण होणार असल्याने धोक्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर समुद्रातील सर्व बोटींनी जवळच्या किनाऱ्याच्या आश्रय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.दुपार पासून वायरलेस वर संपर्क होत असलेल्या बोटीचा मुसळधार पावसामुळे संपर्क तुटला असून जिल्ह्यातील सुमारे 400 ते 500 बोटी अजूनही समुद्रात असल्याचे समजते.