अबब …राम रहिमच्या ‘डेरा’च्या बँक खात्यांमध्ये इतके कोटी रुपये

By | September 21, 2017

बलात्काराच्या गुन्ह्यात तरुंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहिमच्या ‘डेरा सच्चा सौदा’च्या मुख्यालयाबद्दल रोज नवीन नवीन माहिती उघडकीला येत आहे. गुरमीत राम रहीम आता जेलमध्ये असला तरी हरियाणा पोलीस त्याची स्थावर मालमत्ता व जुनी कागदपत्रे तपासून पाहत आहेत.
नवीन आलेल्या माहितीनुसार ‘डेरा’च्या बँक खात्यांमध्ये ७४.९६ कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ‘डेरा’ची भारतातील विविध बँकांमध्ये तब्बल ४७३ खाती आहेत. गुरमीत बाबा राम रहिमच्या नावाने असलेल्या १२ बँक खात्यांमध्ये ७.७२ कोटी रुपये आहेत. तर दत्तक मुलगी असलेल्या हनीप्रीतचे सहाबँकेमध्ये अकाउंट असून ह्या खात्यांमध्ये १ कोटींहून अधिक रुपये असल्याची माहिती मिळाली आहे.तसेच राम रहिमच्या चित्रपट निर्मिती कंपनी असलेल्या हकिकत एन्टरटेन्मेंटच्या नावाने असलेल्या २० बँक खात्यांमध्ये तब्बल ५० कोटी रुपये आहेत.
राम रहिमला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर त्याच्या अनुयायांनी घडवून आणलेल्या हिंसाचारानंतर सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी ‘डेरा’च्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे मूल्यांकन करण्याचे आदेश पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने दोन्ही सरकारांना दिले होते. त्यानुसार ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. हरयाणात असलेल्या ‘डेरा’च्या मालमत्तेची यादीच सरकारने तयार केली आहे. डेराची सिरसामध्ये तब्बल १४३५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच डेराशी संबंधित ५०४ बँक खाती आहेत. त्यातील ४९५ खाती सिरसा जिल्ह्यातील बँकांमध्ये आहेत. त्यातील बहुतांश मुदत ठेवी आहेत. तर काही राम रहिम, मुलगी हनीप्रीत, चरणप्रीत, मुलगा जसमीत, पत्नी, डेरा सच्चा सौदा ट्रस्ट आणि संबंधित कार्यालयांच्या नावाने संयुक्त खाती आहेत. राज्य सरकारने आता मात्र सर्व खाती गोठवली आहेत.
दरम्यान हनी प्रीत अजूनही फरार असून ती नेपाळ बॉर्डरवर असल्याचे बोलले जातेय, भारत सरकार नेपाळ पोलिसांच्या मदतीने तिचा शोध घेत आहे. तिला अटक झाली तर अजून बऱ्याच प्रकरणाचा पर्दाफाश होऊ शकेल .