भगवान गडावर भाषण करण्याच्या पंकजा मुंडे यांच्या भावनिक सादेला मिळाला ‘हा ‘ रिप्लाय

By | September 28, 2017

मी भगवान गडाची लेक आहे. लेकीला दिवाळीची भेट म्हणून फक्त २० मिनिटे भगवान गडावर भाषण करण्याची परवानगी द्या, अशी भावनिक साद पंकजा मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री यांना घातली होती . महंत यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते . मात्र नामदेव शास्त्री यांनी ही साद धुडकावून लावली आहे, त्यामुळे या वर्षीही पंकजा मुंडे भगवान गडावर दसरा मेळावा घेऊन शकतील किंवा नाही ही बातमी शेवटच्या दिवसापर्यंत गुलदस्त्यातच राहणार आहे.

वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान गडावर अनेक वर्षे दसरा मेळावा होत असे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे या मेळाव्याला हजर राहून दर वर्षी भाषण करीत असत. मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी भाषण केले होते. मात्र गेल्या वर्षीपासून राजकीय भाषण करण्यास महंत नामदेव शास्त्री यांनी बंदी केली, गडाचा एक राजकीय व्यासपीठ म्हणून वापर होऊ नये अशी भूमिका महंत नामदेव शास्त्री यांची आहे . नामदेव शास्त्री यांना पंकजा मुंडे समर्थकांकडून धमक्याही दिल्या गेल्या आहेत.

मागील वर्षी हा मेळावा भगवान गडाच्या पायथ्याशी झाला होता. काही दिवसापूर्वी पंकजा मुंडे समर्थकांनी महंतांची सुपारी देऊ असे वक्तव्य केले होते. मात्र पुन्हा पंकजा मुंडे यांनी नमते घेत, ‘‘मला दिवाळीची भेट म्हणून २० मिनिटे द्या’’ अशी भावनिक साद पत्र पाठवून घातली होती परंतु महंतांनी ती अमान्य केली आहे.

भावनिक आवाहन हे घातक आहे. जर प्रत्येकाने अशी २०-२० मिनिटे मागितली तर भगवानगडाच्या ट्रस्टची समस्या फार मोठी होईल असे म्हणत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना स्पष्ट नकार कळवला आहे.

नामदेव शास्त्री म्हणाले की, पंकजा मुंडे यांचे पत्र मिळाले. आता त्याला परवानगी द्यायची की नाही हा माझा एकट्याचा नव्हे तर ट्रस्टचा निर्णय असतो. मागच्या वेळी भगवानगडावर प्रचंड गोंधळ झाला होता. गडावर दगडफेक झाली होती, चप्पला मारल्या गेल्या होत्या. हे भावनिक आवाहन ऐकायला बोलायला चांगले वाटते. पण प्रत्यक्ष कृतीत घातक आहे.

भगवानगड हे सर्व धर्माच्या ,जातीच्या लोकांचे देवस्थान आहे.त्यामुळे राजकारण नको, किर्तनकाराशिवाय दुस-या कुणाचाही आवाज गडावरून ऐकायला गेला नाही पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे असे नामदेव शास्त्रींनी स्पष्ट केले . गोपीनाथ मुंडे हे पक्ष नव्हते तर ते श्रेष्ठ व्यक्ती होते. गोपीनाथ मुंडे जेव्हा गडावर यायचे तेव्हा पक्ष बाजूला सारून यायचे. त्यामुळे त्यांची तुलना समाजामध्ये वेगळी आहे. ट्रस्टने भगवानगडावर कोणत्याही राजकीय पक्षाला येण्यास परवानगी नाकारली आहे. कुण्या एकटय़ा व्यक्तीने दुखी होण्याचे काही कारण नाही , असेही नामदेव शास्त्री पुढे म्हणाले.

आता पंकजा मुंडे समर्थक काय भूमिका घेतात हे बघणे महत्वाचे आहे

?पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ?