दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात- पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान

By | September 19, 2017

अमृतसर: दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात, असे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलले जातात. त्यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या या वाढलेल्या दरांवर विरोधकांनी सरकारला फैलावर घेतले आहे . शिवाय जनसामान्यातूनही टीका होते आहे. सरकारच्या या धोरणावर विरोधकांकडून सगळीकडून सडकून टीका झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दिवाळीपर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे.

पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये दिवाळी आहे. याचवेळी इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वर्तवली आहे. इंधनाचे दर जीएसीटी कक्षेत येतील का? असा प्रश्न विचारला असता इंधन दर जीएसटीच्या कक्षेत यावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. असे झाल्यास ग्राहकांना याचा फायदा होईल असंही धर्मेद्र प्रधान यांचं म्हणणं आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतींवर अंकुश ठेवण्यासाठी त्याचा जीएसटीमध्ये समावेश करावा, असं सांगून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चेंडू अर्थ मंत्री अरूण जेटलींकडे टोलावला आहे

३ जुलैपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने बदलत आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे दिवाळीमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

गेल्या वर्षभरापासून पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे मोदी सरकारवर टीका होत आहे. . केंद्र सरकारने 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू केला पण पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आला नाही. गेल्या एका महिन्यातच पेट्रोलच्या किंमत सात रूपयांनी वाढल्या आहेत. गुरुवारी (14 सप्टेंबर ) रोजी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 70.39 रुपये प्रतिलीटर, कोलकातामध्ये 73.13 रुपये प्रतिलीटर, मुंबईत 79.5 रुपये प्रतिलीटर आणि चेन्नईमध्ये 72.97 प्रतिलीटर इतकी होती. ऑगस्ट 2014 पासूनच्या पेट्रोलच्या या सर्वाधिक किंमती आहेत.

सध्याच्या दरानुसार भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना एक लीटर पेट्रोल अवघ्या 21 रूपयांना मिळतं. त्यावर प्रक्रिया करून वापरण्याजोगं बनवण्यात त्याला 10 रूपये खर्च होतो. म्हणजे सरकारने कोणता टॅक्स आकारला नाही, तर 31 रूपयांमध्ये पेट्रोल मिळू शकतं. पण सध्याच्या करव्यवस्थेत केंद्र सरकारशिवाय राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलवर व्हॅट आकारला जातो. राजधानी दिल्लीत 27 टक्के व्हॅट तर मुंबईत 47.64 टक्के व्हॅट लागतो. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी तफावत पाहायला मिळते.याशिवाय भारताच्या सर्व शेजारील राष्ट्रात देखील भारतापेक्षा स्वस्त पेट्रोल व डिझेल चे रेट आहेत.