कोल्हापूर-शिर्डी झुकझुक गाडी येत्या बुधवारपासून सुरु

By | September 24, 2017

kolhapur shirdi railway

कोल्हापूरच्या पर्यटनविकासाला चालना देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याची सुरुवात म्हणून कोल्हापूर-शिर्डी (साईनगर) मार्गावर रेल्वे येत्या बुधवारी (ता. 27) दुपारी 4 वाजून 35 मिनिटांनी येथून सुटणार आहे. अर्थात “हॉलिडे स्पेशल’ या नावाने प्रायोगिक तत्त्वावर आठवड्यातून एकदा धावणाऱ्या या रेल्वेला प्रतिसाद मिळाला, तरच भविष्यात ही रेल्वे नियमित धावणार आहे,’ अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

महाडिक म्हणाले , गेली तीन वर्षे सतत पाठपुरावा केल्यानंतर पुणे येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक जी. डी. शर्मा यांच्या बैठकीत कोल्हापूर-शिर्डी मार्गावर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय झाला. येथील शाहू महाराज टर्मिनसवरून दुपारी साडेचारला सुटणारी रेल्वे गुरुवारी पहाटे 5.55 ला शिर्डी येथे पोचणार आहे.

तर परत गुरुवारी शिर्डी येथून सकाळी 8.25 ला कोल्हापूरसाठी रेल्वे निघेल. ही रेल्वे त्याच दिवशी गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता कोल्हापुरात पोचणार आहे. मिरज, सांगली, सातारा, पुणे, दौंड, नगर येथे रेल्वे थांबणार आहे.सर्वसाधारण तिकिटाचा दर 170; तर स्लिपर कोचचा 330 रुपये असेल. शिर्डी रेल्वे सुरू झाल्यामुळे कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील भाविकही कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन करून शिर्डीला जाऊ शकतात. त्यामुळे कोल्हापूरच्या पर्यटनात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल.

लवकरच कोल्हापूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म दोन व तीनवर लिफ्टची व्यवस्था होणार आहे. विक्रमनगर परिसरातील पादचारी पुलाचे रेंगाळलेले काम लवकरच सुरू होईल.त्याबरोबरच स्थानकात वेगवान “वायफाय ‘ सुविधा देण्यात येईल. महिलांच्या सुरक्षेसाठी देशातील रेल्वेत महिलांच्या डब्यासह सर्वच डब्यांत सीसीटीव्ही बसविण्याच्या कामास सुरवात झाली आहे. लवकर सर्वच डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. अशीही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली .

एकंदर कोल्हापूर पर्यटनाला भविष्यात सुगीचे दिवस येण्याची चिन्हे आहेत

?? पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ??