घोटाळेबाज भाजप ह्या शिवसेनेच्या पुस्तिकेत ‘ ह्या ‘ मंत्र्याला सॉफ्ट कॉर्नर दिल्याची ही आहेत कारणे

By | November 4, 2017

reasons why shivsena ignored pankaja mundhe from ghotalebaaj bhajap booklet

शिवसेना व भाजप यांच्यात एकमेकांवर चिखलफेक केल्याशिवाय एकही दिवस जात नाही . सत्तेत सहभागी झाल्यापासूनच रोज एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप सुरु आहेत . भाजप सरकारच्या मंत्र्यांची नावानिशी घोटाळ्याची पुस्तिका पुढे शिवसैनिकांना देण्यात आली, मात्र भाजपने ही गोष्ट सिरियसली घेत तेवढ्याच ताकतीने प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरु केली आहे . मात्र ह्या घोटाळा पुस्तिकेत शिवसेनेने एका मंत्र्याबद्दल भरभरून टीका करण्याचे टाळले आहे त्या म्हणजे पंकजा मुंडे .

शिवसेनेकडून काढण्यात आलेल्या ‘घोटाळेबाज भाजप’ या पुस्तिकेमध्ये महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना पद्धतशीरपणे बाजूला ठेवण्यात आले आहे. चिक्की घोटाळा असा उल्लेख तर पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर आहे. मात्र त्याचा जास्त तपशील न देता पंकजा मुंडे यांचे चित्र देखील छापण्याचे टाळले आहे. बीड जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी असणे, उद्धव ठाकरे यांनी मुंडे यांना बहीण मानलेले असणे, याची आठवण करून दिली जात आहे.

घोटाळेबाज भाजप नावाच्या पुस्तिकेच्या पहिल्या पानावर एकनाथ खडसे, विनोद तावडे ,गिरीश बापट व दिलीप गांधी यांची छायाचित्रे ठसठशीतपणे शिवसेनेकडून प्रकाशित करण्यात आली आहेत. पहिल्या पानावर पहिल्या क्रमांकाच्या घोटाळा यादीत ‘चिक्की’चा उल्लेख तर आहे. मात्र, त्याचा तपशील देण्याचे टाळले आहे. मात्र हे घोटाळ्याचे आकडे मात्र शिवसेनेने पत्रकारांच्याच भरवशावर दिलेले आहेत . त्यात केवळ वर्तमानपत्रातील कात्रणेच आहेत.

पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांना शिवसेनेकडून जाणीवपूर्वक सॉफ्ट कॉर्नर दिल्याचे बोलले जातंय. शिवसेनेकडून पंकजा मुंडे यांना पुस्तिकेतून जाणीवपूर्वक बाजूला ठेवले असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने बीडमध्ये पंकजा मुंडे यांना पाठिंबा दिला होता. बीड जिल्ह्यात शिवसेनेचा तसाही प्रभाव नाही मात्र शिवसेना आणि गोपीनाथ मुंडे यांचे नाते नेहमीच सलोख्याचे राहिले होते. १९९९ मध्ये पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी असताना मुंडे यांनी खो घातला होता, अशी भावना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली होती, मात्र ह्या कारणावरून देखील शिवसेना आणि मुंडे यांच्यात कधी दुरावा निर्माण झाला नव्हता. भाजपमध्ये महाजन, मुंडे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यात नेहमीच चांगले संबंध होते. हे लक्षात ठेवूनच शिवसेनेने पंकजा मुंडे यांच्याबद्दल ह्या पुस्तिकेत सॉफ्ट कॉर्नर दाखवला असल्याची चर्चा आहे.

मात्र विषय राज्याच्या प्रश्नाचा आहे कि कौटुंबिक जिव्हाळ्याचा याचा देखील शिवसेनेने विचार करायला हवा. अशी प्रतिक्रिया लोक शिवसेनेबद्दल देऊ लागले आहेत . जर शिवसेनेचा हेतू साफ आहे तर त्यात सर्वांना समान न्याय का नाही ? हे देखील एक प्रश्चचिन्ह आहे.

मात्र भाजप मंत्र्यांच्या घोटाळ्यांच्या पुस्तिकेचे हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच शिवसेनेनं या प्रकरणातून आपली जबाबदारी झटकण्यास सुरुवात केलीय. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिगत स्तरावर शिवसेनेची भाजपच्या बदनामीची खेळी गांभीर्यानं घेतल्यानं आणि त्याच ताकदीनं प्रत्त्युत्तर देण्याची तयारी सुरु झाल्यामुळे शिवसेनेची भंबेरी उडाली असल्याचं बोललं जातंय . ही पुस्तिका मंत्र्यांच्या नावानिशी व्यक्तिगत स्वरुपाची असल्याने भाजप इतक्या सहजतेने ही गोष्ट सोडून देईल असे वाटत नाही.ती शिवसेनेची अधिकृत पुस्तिका नाही, असं स्पष्टीकरण आता शिवसेनेकडून देण्यात येतंय. मात्र शिवसेनेच्या बैठकीत वाटली गेलेली ही पुस्तिका शिवसेनेची नाही यावर विश्वास कसा ठेवायचा, हा देखील भाजप पुढे प्रश्न आहे .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?