आता पुढची टाळी गालावर : राज ठाकरे यांचा शिवसेनेवर जोरदार प्रहार

By | October 15, 2017

raj thakare patrakar parishad mumbai

मुंबईतील मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते . नगरसेवकांची फोडाफोडी करुन शिवसेनेने गलिच्छ राजकारण केले. मी हे कधीच विसरणार नाही. उद्धव ठाकरेंच्या याच घाणेरड्या राजकारणामुळे मी शिवसेना सोडली होती. बाळासाहेबांनी मला फोडाफोडीचं राजकारण कधीच शिकवलं नाही. जनतेशी प्रतारणा करणारे राजकारण मी करत नाही, आता हातावर नव्हे गालावर टाळी देणार शिवाय फोडाफोडीसाठी ३० कोटी रुपये कुठून आणले ? असा सवालही त्यांनी शिवसेनेला विचारला आहे.

शिवसेनेने गलिच्छ आणि खालच्या पातळीवर राजकारण केले असून यामुळे राज्यातील जनतेमध्ये राग आहे. चूक लक्षात आल्याने शिवसेनेने आता आम्हीच आमचे नगरसेवक तिकडे पाठवल्याची अफवा पसरवली. मात्र आम्ही आमचे नगरसेवक शिवसेनेत पाठवलेले नाहीत. आम्हाला पाठवायचे असते तर सगळेच्या सगळे सात नगरसेवक तिकडे पाठवले असते. या अफवांमध्ये काहीतरी तथ्य नाही, नगरसेवकांनी शिवसेनेत जाण्यामागे आमचा बिलकुल हात नाही, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले .

शिवसेनेला मराठी माणसाशी काहीही घेणेदेणे नाही. फोडाफोडीचे राजकारण करुन शिवसेनेने निवडून दिलेल्या मराठी माणसाचा विश्वासघात केला.शिवसेनेने पाच- पाच कोटी रुपये देऊन नगरसेवक फोडले. म्हणजेच हा व्यवहार सुमारे ३० कोटींचा आहे. मग एवढे पैसे सेनेकडे कुठून आले ,असाही आरोप त्यांनी शिवसेनेवर केला.

मला यापूर्वीच ह्या नगरसेवकांविषयी कुणकुण लागली होती,मग मी स्वतःच त्यांची बैठक घेतली, त्यावेळी सर्वानी मला पक्षात राहण्याची ग्वाही दिली होती . ज्यांनी स्वतःला बाजारात ५कोटी रुपयांना विकायला ठेवले, त्यांच्यावर काय बोलणार ? शिवसेना सोडून बाकी पक्ष काय करतात तो वेगळा विषय आहे, पण मला शिवसेनेकडून ही अपेक्षा नव्हती. माझ्या मते राजकारण हे उमदं असायला पाहिजे.अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवरील नाराजी व्यक्त केली.

भविष्यात सेनेला टाळी देणार का? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले, शिवसेनेने एकदा आमच्याशी चर्चा केली असती तर आम्ही मदत केली असती. आता यापुढे हातावर नव्हे तर गालावर टाळी देणार असा जोरदार टोला त्यांनी शिवसेनेला दिला. मी शिवसेनेतून बाहेर पडल्यावर पक्षस्थापन करण्याचा विचार केला नव्हता. मी ज्यावेळी पक्षस्थापन केला तेव्हा शिवसेनेसह इतरही काही राजकीय पक्षांमधील नेते मनसे मध्ये प्रवेश करण्यास इच्छुक होते, मात्र मी त्यांना प्रवेश दिला नव्हता, असेही राज ठाकरे म्हणाले .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?