‘अशी ‘ झाली राज ठाकरे यांची फेसबुकवर इंन्ट्री

By | September 21, 2017

जगात ज्या चांगल्या गोष्टी आहेत, डॉक्युमेंट्रीज आहे त्या तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी फेसबुक पेज सुरु करण्याचा निर्णय घेतला.

जनतेशी संवाद साधण्यासाठी, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी आपण फेसबुक पेज सुरु करत आहोत असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.
महिन्यात एकदा आपण फेसबुक लाईव्ह करणार असून, त्यावेळी जनता, कार्यकर्त्यांशी संवाद साधू. त्यांच्या समस्या ऐकू असे राज यांनी सांगितले. या पेजवरुन राज ठाकरे त्यांची व्यंगचित्रही शेअर करणार आहेत.

मागील निवडणुकांमधील सततच्या पराभवानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षाची नव्याने बांधणी सुरु केली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. लोकांशी संपर्क वाढावा व आपली मते स्पष्टपणे मांडता यावीत यासाठी फेसबुक पेजचा वापर केला जाणार आहे.

गेल्या काही वर्षात सोशल मीडिया हे प्रचार, प्रसाराचं महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून पुढे येत आहे. देशातील सामाजिक, राजकीय परिस्थिती तसंच राजकीय नेत्यांवर खुलेपणाने टीका करताना आपण सगळ्यांनीच राज ठाकरेंना पाहिलं आहे. त्यामुळे या फेसबुक पेजवर आता काय काय बघायला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे .

मनसे मधील गट – तट अजिबात खपवून घेणार नाही. कोणत्याही पदाधिका-याची अथवा कोणाचीही तक्रार किंवा कोणतीही समस्या असल्यास आपल्याला थेट वैयक्तिक मेल आयडीवर संपर्क करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

देशात सध्या अप्रत्यक्ष आणीबाणी लागू झाल्याचे चित्र आहे. इंदिरा गांधी यांनीही असाच प्रयत्न केला, तेव्हा जनसंघाने त्याला विरोध केला होता. आता बहुधा भाजपाला इंदिरा गांधी यांची भूमिका योग्य वाटत असावी, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राजकीय फायद्यांसाठी चुकीचे पायंडे पाडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज यांची फेसबुकवरील एन्ट्री धडाक्यातच झाली आहे, असे म्हणावे लागेल. कारण, पेज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्याला तब्बल साडेचार लाख लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय, ट्विटरवरही राज यांचा मोठा बोलबाला पाहायला मिळतो आहे. सध्या ट्विटरच्या भारतातील ट्रेंड लिस्टमध्ये RajThackerayOnFB हॅशटॅग चौथ्या स्थानावर ट्रेंडिंग ला आला होता.