असा करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्राचा उपवास

By | September 21, 2017

narendra modi

आजपासून देशभरात नवरात्रीच्या उत्सवाला प्रारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील देवीच्या उपासनेसाठी नऊ दिवस उपवास करणार आहेत. नरेंद्र मोदी हे गेल्या २८ वर्षांपासून नवरात्र उपवास करत आहेत.

आजपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव २९ सप्टेंबरला संपेल, त्यानंतर दहाव्या दिवशी दसऱ्याचा सण साजरा केला जाईल. नवरात्रौत्सवाच्या काळात दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. आज घटस्थापन झाल्यानंतर दुर्गेचे पहिले रूप असणाऱ्या शैलपुत्री देवीची उपासना केली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर ते नऊ दिवसांच्या उपवासात ते फक्त पाणीच पितात. इतके कडक उपवास असूनही ते कामाचा व्याप कसा सांभाळतात, असा प्रश्न साहजिकच अनेकांना पडतो. मात्र, मोदी गेल्या अनेक वर्षांपासून अशाप्रकारे उपवास करत असल्यामुळे त्यांना विशेष त्रास जाणवत नाही,नवरात्र संपल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी ते शस्त्रांची पूजाही करतात. गोरखपूर येथील मठाचे अधिपती असणारे व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही नवरात्रीत उपवास करतात. आज ते गोरखनाथ मंदिरात घटाची स्थापना करतील.

नवरात्राच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह राज्यभरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवरात्रौत्सवात मंडळे तसेच गरबा आयोजन करणाऱ्यांना ध्वनिवर्धकासंदर्भात दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे सांगण्यात आलेले आहे.