शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार चालवल्याबद्दल ‘ यांनी ‘ केले फडणवीस यांचे अभिनंदन

By | November 3, 2017

narayan rane congrats devendra fadanvis on 3 years of government

राज्याच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याचे संकेत सरकारने दिले असल्याने निष्क्रिय मंत्र्यांना घरी बसवण्यात येणार असल्याचे समजते . राज्याच्या मंत्रिमंडळात आपला प्रवेश जवळजवळ निश्चित असल्याचे संकेत मिळताच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या नाकावर टिच्चून तीन वर्षे सरकार यशस्वीपणे चालवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो, अशा स्वरूपाचे ट्विट करत त्यांनी शिवसेनेवर हल्ला केला आहे .

महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारला ३१ ऑक्टोबरला ३ वर्षं पूर्ण झाले.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून अखेर जनतेने सत्तेची धुराचे भाजप -शिवसेनेकडे सोपवली आणि महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडून आले. अर्थात ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली तेव्हा शिवसेना सत्तेत सहभागी नव्हती. मात्र होय बाबा , नाही बाबा असे करता करता २ महिन्यानंतर शिवसेना देखील सत्तेत सहभागी झाली. शिवसेना सत्तेत सहभागी होऊन देखील एक प्रकारे विरोधकांचीच भूमिका पार पडत आहे असे म्हटल्यास नवल ठरवणार नाही..मात्र हात दगडाखाली असल्याने शिवसेना देखील जास्त आक्रमक नाहीये.

राज्यात भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार सत्तेत येऊन तीन वर्षे झाली. सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीचे मूल्यमापन विविध स्तरांवर केले जात आहे. तर या कालावधीत राज्यात कोणकोणत्या योजना यशस्वीपणे राबवल्या हे भाजप आणि सरकारच्या प्रतिनिधींकडून पटवण्यात येत आहेत .आणि येत्या काही दिवसांत राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात काही ‘अकार्यक्षम’ मंत्र्यांना डच्चू, तर काही नवोदितांना संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणेंना मंत्रीपद संधी मिळणार असल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिले होते. त्यामुळे राणेंना मंत्रिपद मिळणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्याचवेळी राणेंनी भाजप -शिवसेना सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधत मुख्यमंत्र्यांना खास शैलीत शुभेच्छा देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपल्या ट्विटवरून शुभेच्छा देणारे पोस्टर ट्विट केले आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षे यशस्वीरित्या सरकार चालवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तीन वर्षे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार टिकवले आणि चालवले. त्यामुळे शिवसेनेला नाकच राहिले नाही. मुख्यमंत्र्यांचे पुन्हा अभिनंदन आणि शुभेच्छा..’ असे ट्विट करून त्यांनी शिवसेनेला खिजवण्याचा प्रयत्न केला आहे .

अर्थात शिवसेनेकडून मात्र याबद्दल अजून काही प्रतिक्रिया आली नाही.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?