पंतप्रधान फिट, देश अनफिट : मोदी यांच्या फिटनेसवर हल्लाबोल

By | June 15, 2018

modi fitness video targetted

लष्कराचे जवान औरंगजेब आणि ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील अशांतता आणखी वाढली आहे. काश्मीरमध्ये जवान, संपादकांची हत्या होत असताना पंतप्रधान मोदी मात्र व्यायामात मग्न आहेत, अशी शब्दात समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे .

‘देशाचे जवान शहीद होत आहेत. पत्रकार, मजूर, विद्यार्थी मारले जात आहेत. मात्र मोदींसाठी तंदुरुस्ती जास्त महत्त्वाची आहे. एकीकडे जवान शहीद होताना दुसरीकडे पंतप्रधान व्यायाम करत आहेत. पंतप्रधान फिट, देश अनफिट,’ अशा शब्दांमध्ये आझम खान यांनी मोदी यांच्यावर टीका केली. काल लष्कराचे जवान औरंगजेब यांची हत्या करण्यात आली होती. रात्री त्यांचा मृतदेह लष्कराच्या हाती लागला. तर रात्री आठच्या सुमारास रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये गोळ्या झाडून हत्या केली.

काल रात्री शुजात बुखारी यांच्यावर लाल चौकात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. बुखारी गाडीत बसत असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात बुखारी गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बुखारी यांच्या हत्येचा जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला.