मुलाला इंजिनिअर करण्यासाठी केली तब्बल ५ कोटीची चोरी

By | October 8, 2017

hadapsar image pune

भरभक्कम वाढलेली शिक्षणाची फी परंतु मुलाला शिकवण्याची जिद्द यात आर्थिक परिस्थिती खराब असेल तर त्या बापावर काय वेळ येऊ शकते ? मुलाच्या शिक्षणासाठी मुलाला अभियंता करण्यासाठी ह्या बापाने वडिलोपार्जित आठ ते दहा गुंठे जमीन विक्री केली. मात्र, तितक्यावरही न भागल्याने उभा राहिलेला कर्जाचा डोंगर..अशा आर्थिक संकटात सापडलेल्या बापाने गुन्हेगारी कृत्य करण्याचा निर्णय घेतला. एटीएम केंद्रात जमा करण्यासाठी चालविलेली चार कोटी ९४ लाखांची रोकड घेऊन तो पसार झाला.मात्र अखेर तो कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात सापडला.

कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात असलेला जीपचालक बबन नारायण खेडेकर (वय ५२, रा. खेडेकर मळा, उरळी कांचन,पुणे ) याला अटक करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर रोजी कंपनीतील सुरक्षारक्षक जीपचालक खेडेकर याला घेऊन एटीएम केंद्रात रोकड जमा करण्यासाठी निघाले. त्यांच्याकडे नऊ कोटी रुपयांची रोकड भरणा करण्यासाठी देण्यात आली होती. दिवसभर रोकड जमा केल्यांतर शेवटी चार कोटी ९४ लाखांची रोकड शिल्लक होती. रात्री आठच्या सुमारास हडपसर भागातील एका एटीएम केंद्रात रोकड जमा करण्यासाठी सुरक्षारक्षक उतरले असताना जीपचालक खेडेकर तेथून चार कोटी ९४ लाखांची रोकड घेऊन पसार झाला.

खेडेकर गाडी घेऊन पसार झाल्याची माहिती हडपसर पोलिसांना देण्यात आली. शहरातून बाहेर जाणाऱ्या महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पडताळण्यात आले. तेव्हा खेडेकर जीप घेऊन सातारा रस्त्याने बंगळुरुच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने कर्नाटक पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी त्याआधारे तपास सुरू केला. तेव्हा तो कर्नाटकातील बंकापूर भागात असल्याची माहिती मिळाली. खेडेकरची मानलेली मुलगी तेथे राहत असल्याचे निष्पन्न झाले मग कर्नाटक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जमा केलेली रोकड जप्त करण्यात आली. खेडेकरचा मुलगा हा सध्या बेरोजगार असून त्याला सध्या नोकरी नाही. मुलाच्या शिक्षणासाठी त्याने पैसे खर्च केले होते,पुढे शिकवावे यासाठी त्याने चोरी केल्याचे बोलले जात आहे . त्याची याआधी गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. फक्त आर्थिक विवंचनेमुळे त्याने गुन्हेगारी कृत्य केल्याचे स्पष्ट झाले

? पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ?