अखेर भात भात करत तिने प्राण सोडला : डिजिटल इंडियाला बोटांचे ठसे आणणार कुठून ?

By | October 18, 2017

hunger death in jharkhand due to aadhaar not linked to ration card

सरकारी बाबूची बाबूगिरी असो किंवा रेशन दुकानदाराची मुजोरी. २ वेळेच्या पोटासाठी गरीबाची होणारी हेळसांड काही संपत नाही . शिधावाटप दुकानात रेशन कार्डला आधार लिंक केलेलं नव्हते म्हणून जीव गमावण्याची दुर्दैवी घटना आपल्या भारतात घडली आहे.

आधारकार्ड सगळ्या सेवांना हळूहळू लिंक करण्याची सरकारची सक्ती मात्र एका कुटुंबाला खूप महागात पडली. ही दुर्दैवी घटना झारखंडची आहे . झारखंड जिल्ह्यातील एका शिधावाटप दुकानात रेशन कार्ड आधारला लिंक न केल्यामुळे कुटुंबाला धान्य नाकारण्यात आले . २८ सप्टेंबरला ही घटना घडली होती. दुर्देवाची गोष्ट म्हणजे यानंतर त्या कुटुंबातील संतोषी कुमारी या ११ वर्षीय मुलीचा उपासमारीमुळे मृत्यू झाला. शेवटच्या क्षणापर्यंत ही मुलगी ‘भात खायला द्या’, अशी विनवणी करत होती, असे तिच्या आईचे म्हणणे आहे .

अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या,घरात धान्यच नसल्यामुळे कुटुंबीयांना तिला काहीच खाऊ घालता आले नाही. शेवटी भात भात करत तिने प्राण सोडला . मी रेशनच्या दुकानावर तांदूळ आणायला गेले होते. मात्र, दुकानदाराने तुम्हाला रेशन मिळणार नाही, असे सांगितले. दिवसभर पोटात काही नसल्यामुळे माझ्या मुलीचे पोट खूप दुखत होते. २४ तास उलटून गेले तरी माझ्या मुलीच्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. अखेर माझ्या मुलीने ‘भात-भात’ म्हणत जीव सोडला, अशी माहिती मुलीची आई कोयली देवी यांनी दिली.

मानवतेला काळिंबा फासणारा हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनावर सगळीकडून टीका होण्यास सुरूवात झाली. उपलब्ध असलेल्या , प्राथमिक माहितीनुसार संबंधित कुटुंबाचे रेशन कार्ड आधारला जोडण्यात आले नव्हते. त्यामुळे हे रेशन कार्ड रद्द करण्यात आले. या प्रकरणी सारवासारव करत झारखंडचे अन्नपुरवठा मंत्री सरयू राय यांनी म्हटले की, आधार कार्ड नसले तरी लोकांना रेशन द्या, असा स्पष्ट आदेश मी दिला होता. संबंधितांची ओळख पटवून त्यांना धान्य दिले जाणे गरजेचे होते , मात्र खरंच आधार कार्डामुळे अडवणूक होऊन कुणाचा मृत्यू झाला असेल तर अधिकाऱ्यांनी याविरूद्ध कडक कारवाई करायला हवी होती,असेही त्यांचे म्हणणे आहे . झारखंड सरकारने काही महिन्यांपूर्वी शिधावाटप दुकानांमधून आधारकार्ड व अंगठ्याच्या ठशांच्या आधारे सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला होता.

डिजिटल इंडिया होईल तेव्हा होईल पण माणसेच राहिली नाही तर डिजिटल इंडिया ला बोटांचे ठसे आणणार कुठून ? असा संतप्त प्रश्न लोक सरकारला या घटनेनंतर विचारू लागले आहेत.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?