‘ असे ‘ बनतात टुकार मराठी सिनेमे : ऍक्टर डायरेक्टरसाठी.. डायरेक्टर प्रोड्युसरसाठी.. प्रोड्युसर पैशासाठी

By | October 5, 2017

this is how worst marathi movie is made

बऱ्याच दिवसांपूर्वी मी लहान मुलांच्या सोबत एक खेळ खेळायचो .. एका मुठीत चॉकलेट आणि एक मूठ रिकामी .. लहान पोरगा यायचा आणि मूठ उघडून बघायचा .. चॉकलेट दिसलं कि पोरगा खुश व्हायचा अन मूठ रिकामी दिसली कि जरा नाराज व्हायच पण जिद्द सोडत नव्हता .. पुढे पुढे मी मुठीत चॉकलेट ठेवणेच बंद केले .. तरी तो पोरगा यायचा .. मूठ उघडून बघायचा आणि नाराज होऊन निघून जायचा . पुढे मुलगा मोठा झाला .. माझ्या ह्या खेळात काय त्याला रस वाटेना झाला .. मग मी दोन्ही हातात चॉकलेट ठेवायचो .. त्याला हाक मारून बोलवायचो पण तो यायचा नाही .. कारण का ? माझ्या रिकाम्या मुठी पाहून पाहून तो कंटाळला होता आणि आता तो मोठा झाला होता .. असेच काहीस मराठी चित्रपटाचं झालाय का ? मराठी आहात म्हणून मराठी बघा ते सांगायची वेळ निर्मात्यांवर का येते ? गेल्या बऱ्याच दिवसापासून बोटावर मोजण्याइतके काही मराठी चित्रपट सोडले तर एक शो सुद्धा न झालेले कित्येक मराठी चित्रपट सापडतील. ही अशी वेळ का आली ? यावर थोड लिहतोय.. अर्थात कोणावरही वैयक्तिक राग किंवा लोभ नाही ..मनात आला म्हणून लिहतोय .. मी पण कट्टर मराठीच आहे पण चित्रपट क्षेत्रात किती दिवस दादासाहेब फाळकेंच्या पुण्याईचा आधार आणि भांडवल करणार ?

तर अशा रीतीने टुकार मराठी सिनेमा बनण्याची सुरुवात होते . सगळ्यात आधी सुरुवात होते ती प्रोड्युसर पासून . गेल्या काही वर्षांपासून आपण प्रोड्युसर च्या नावांवर नजर टाकली तर बहुतांशी प्रोड्युसर हे नवीन असतात किंवा त्यांचा चित्रपट क्षेत्रात हा पहिलाच प्रयत्न असतो . आता बरेचसे प्रोड्युसर हे, काही खूप चित्रपट बघणे.. त्याची समीक्षा करणे किंवा पब्लिक ला तो आवडेल कि नाही याचे फार गणित लावत बसत नाही, किंवा त्यांची बुद्धिमत्त्ता तिथे कमी पडते. प्रोड्युसर हे त्यांच्या त्यांच्या दुसऱ्या उद्योग धंद्यात सेट असतात आणि एक नवीन व्यवसाय ह्या बुद्धीने चित्रपट निर्मितीकडे पाहतात तर काही फक्त आणि फक्त अनुदानाच्या आशेने पैसे लावणारे महाभाग देखील आहेत .

आम्ही इतके पैसे लावणार आणि इतके मिळणार .. शेवट चित्रपट हा एक जुगार आहे , हे सर्व डायरेक्टरने त्यांना पटवून पटवून सांगितलेले असतेच शिवाय जर नाहीच मुव्ही चालला तर सरकारी अनुदान आहेच .. ८० लाखापर्यंत .. .डायरेक्टरला त्याच्या नावावर एक चित्रपट बनवायचा असतो, निमूटपणे प्रोड्युसर सांगेन त्या पैशात आणि सांगेन त्या टर्म वर डायरेक्टर काम करायची तयारी दाखवतो .. असे साधारण एवढे सगळे गणित मांडून झाल्यावर शोध सुरु होतो चांगल्या स्क्रिप्टचा .आता स्क्रिप्ट ही डायरेक्टर व प्रोड्युसर यांना करमणूक करणारी नसेल तरी चालेल , पण त्यातून महाराष्ट्राचे दारिद्र्य, गरिबी, जातीयवाद आणि यातून आम्हाला काहीतरी मेसेज देता येईल अशी पाहिजे असते . म्हणजे आम्ही करमणूक करावी म्हणून चित्रपट बनवत नाही तर अवॉर्ड मिळावे म्हणून बनवतोय .

सहज आठवले, पु. ल. देशपांडेच्या अंतू बरवा मध्ये अंतू नाटक पाहायला जातो, तेव्हा तिकिट खिडकीवरच्या माणसाशी निम्म्या तिकिटात घ्या म्ह्णून हुज्जत घालत असतो. शेवटी तो माणूस वैतागून म्हणतो , निम्म्या तिकिटात बघायला हा काय डोंबाऱ्याचा खेळ आहे का ? अंतू बरवा म्हणतो, ‘ अहो तो बरा.. आधी खेळ दाखवतो . मग थाळी फिरवतो .. ‘ अशीच परिस्थिती सध्या मराठी चित्रपटाची झाली आहे . रडक आणि अभिनय शून्य असलेल दारीद्र्य फुकट पण पाहायला आवडत नाही लोकांना, पैसे घालून कोण बघणार .. दादासाहेब फाळकेंच्या जीवावर किती दिवस तग धरणार ? बॉलीवूड, कॉलिवूड कुठच्या कुठं गेले.बॉलीवूडच्या एका गाण्याच्या बजेट मध्ये २-३ मराठी चांगले सिनेमे बनतील .

असो.. विषय थोडा भरकटला .. आता बऱ्याच मुव्हीची स्क्रिप्ट हि डायरेक्टर यांची स्वतःची असते . बरेचसे डायरेक्टर हे नाट्य क्षेत्रातून इकडे आलेले असतात . आता एक गोष्ट सांगू इच्छितो कि, नाटक पाहणारा जो वर्ग आहे तो सहसा सिनेमे पाहत नाही ..हा बहुतांशी पुण्याच्या पेठेत वगैरे राहतो ..अजूनही तुळशीबागेतून संध्याकाळी बायकोला गजरा घेऊन जाणारा प्रेक्षक वर्ग नाटकाचा आहे .. आणि हाच वर्ग चित्रपटाचा असेल असे काही नाही.. असेलहि पण खूप थोडा. नाटकात एखादी स्टोरी खूप छान वाटली किंवा नाट्य प्रेक्षकाला ती आवडली म्हणून तीच सिनेमामध्ये पण चालू शकेल असे काही नाही .कारण सिनेमाचा जो वर्ग आहे तो सर्व थरात व संपूर्ण महाराष्ट्रात आहे, पण ही दोन वेगळी माध्यमे आहेत , ह्या गोष्टीचा कुठलाही विचार न करता मूळ नाटकाचीच असलेली स्टोरी किती चांगली आहे हे डायरेक्टर प्रोड्युसर महाशयांना पटवून देतात आणि मग स्टोरीवर काम सुरु होते .

यदा कदाचित, डायरेक्टर स्वतः लेखक नसेल तर २ वर्ग लेखकाचे आहेत . पहिला जो पेठेमधल्या ए.सी. घरात बसून स्टोऱ्या लिहतो म्हणजे ज्याचे लिखाणाचे अंग हे घटस्फोट, पुर्नविवाह, वडील व मुलगा यांचे नाते संबंध, शहरीकरणामुळे लोकांमध्ये होत चाललेला दुरावा,समलिंगी संबंध असे काय तरी असते..ज्याच्याशी गावच्या बबनला किंवा रावसाहेबाला किंवा रावसाहेबांचा २१ वर्षाचा उनाड संकेत याला कोणालाच काहीच घेणं देणं नसत ..अशा पिच्चर पेक्षा चांगला मसाला त्यांना सिरीयल मध्ये भेटतो , तो कशाला तिकीट काढून जाईन ( म्हणजे जमिनीपासून २ फूट वरचे विषय आणि आशय अशा स्वरूपांच्या कथा ) .. त्यामुळे ही स्टोरी ज्यांच्या साठी लिहली जाते ते शहरी लोक यांचा मराठी सिनेमा बघायला जात नाही , त्यापेक्षा हिंदी इंग्लिश मल्टिप्लेक्स मध्ये पॉप कॉर्न खात बघतात

आणि २ रा गरिबडा लेखक, हा रानात झाडाखाली बसून लिहत असतो . त्याचा शहराचा अभ्यास कमी त्यामुळे त्याची कथा त्यातली त्यात ग्रामीण बाज असणारी पाटलाचे धूर्त राजकारण , बाई आणि बाटली यासाठी गावात चाललेला संघर्ष आणि त्यातुन ह्या गरिबड्या लेखकाची झालेली घुसमट आदी स्वरूपाचे लिखाण असते . आता इतका ग्रामीण सिनेमा हा मल्टिप्लेक्स ला यायचं तर सोडून द्या, जिथे बनलाय तिथे पण लोक ह्याच दुःख बघायला जात नाहीत . पैसे घालून दुसऱ्याचे दुःख लोक का पाहणार ? असो .. आता स्टोरी तयार होते , पण ग्रामीण बाज वाटावा म्हणून आई बहिणीवर शिव्या गरज नसताना घुसडल्या जातात … (जणू खेड्यातले लोक असेच आहेत का काय असे वाटते इथपर्यंत .. फॅमिली ऑडियन्स ट्रेलर बघुनच फिरकत नाही  ) .. आता ही स्टोरी जेव्हा प्रोड्युसर कडे येते तेव्हा प्रोड्युसर, डायरेक्टर त्याचा नीट अभ्यास ( ? ) करतात. डायरेक्टर महाशय नाटक क्षेत्रातील असल्याने सिनेमा व नाटक यात ते फरक किती आहे याचा अंदाज बांधू शकत नाही व प्रोड्युसर तर त्यांचा तो पिंडच नाही .. थातुर मातुर असे काही सीन खास मजा आणि थोडा मसाला वाटावा म्हणून बळेच ऍड करण्यात येतात, आमी मग कलाकारांचा शोध सुरु होतो

आता कलाकार ह्या व्यक्तीला नाव ठेवायला कुठेच जागा नसते . काम पाहिजे पैसे मिळोत व न मिळोत पण २४ तास मेहनत घेतो, फक्त आपला रोल चांगला झाला पाहिजे . पण नवीन कलाकार लोक थोडे दुर्दैवी म्हणेन मी हवं तर .. झटकन डायरेक्टरवर विश्वास टाकून मोकळे होतात . आपण ज्या गाडीत बसलोय त्या गाडीचा ड्रायव्हर कसा आहे याचा अभ्यास करत नाही , आणि सिनेमाचा अभिनय किंवा कनेक्टिव्हीटी कशी असते ,समाजाला मेसेज न देता कशी करमणूक असते ,ह्या विषयाशी कोणतीच सुसंगती नसलेला माणूस मराठी चित्रपटाचा डायरेक्टर होऊन जातो .

आता कलाकार अभिनय कसा करतो हे तरी कळायला हवे , किंवा अभिनय जो करतोय त्याला निदान सीनची पार्श्वभूमी तरी समजावून सांगावी ना पण तसे केले तर आमची स्टोरी लीक होईन ह्या भीतिपोटी काहीच सांगितले जात नाही आणि कलाकार आपला स्वतःच्या रोलसह आंधळी कोशिंबीर खेळत राहतो . मग अभिनय चांगला कसा होणार . ? ऍक्टर डायरेक्टरसाठी काम करतो .. डायरेक्टर प्रोड्युसरसाठी काम करतो .. प्रोड्युसर पैशासाठी आणि अनुदानासाठी काम करतो .. दुर्दैव हेच कि जो बिचारा पैसे काढून तुमचा चित्रपट पाहायला येणार आहे त्याच्यासाठी कोणीच काम करत नाही .

भारी भारी कॅमेरे आणि सेट लावले जातात .. इतके भारी कि बॉलीवूड,हॉलिवूड चे पण डोळे दिपून जावेत. कोणत्या कॅमेराने शूट करताय यापेक्षा काय शूट करताय हे महत्वाचे आहे, पण सगळीकडे सर सर ऐकून आम्ही इतके हवेत असतो कि काहीच सुचत नाही . अशा पद्धतीने सिनेमा शूट होतो .. एडिटिंग म्युझिक झाले कि सिनेमा बनतो . ( गरज नसताना देखील लावणी ,पोवाडा, असे मुद्दाम घुसडवले जातात .. कारण मराठी बाज त्यामुळेच येतो .. फक्त मराठी डायलॉगने तो येऊ शकत नाही म्हणून लावणी किंवा महारांजावर एखादा पोवाडा टाकला कि आम्ही मराठी चित्रपट क्षेत्रात आमचे योगदान सिद्ध करायला मोकळे )

आता असा सिनेमा बनतो कि ज्यात स्टोरी कोणाला म्हणजे कोणत्या वर्गाला कनेक्ट होऊ शकते याचा अंदाज स्वतः ब्रम्हदेवच काय पण कोणीच लावू शकत नाही . ज्यात स्टोरीच नीट नाही तर अभिनय कितीही भारी असेल तर कोण पाहणार.. (खराब स्टोरी मुळे अमिताभचे सुद्धा कित्येक चित्रपट फ्लॉप झालेले आहेत ) . आता थोडे वळून बघताना हा विचार मनात येतो, आम्हाला स्टोरी फ्री मध्ये पाहिजे होती . कॅमेरेचे मोठे मोठे भाडे आम्ही ४ दिवस एक्सट्रा आमचे वेळेचे नियोजन न झाल्याने सहन करू शकतो पण स्टोरी मात्र फुकट पाहिजे . म्हणजे चित्रपटाचा आत्मा जे आहे ते फुकट पाहिजे. फुकटमध्ये भेटणार तर हे असेच भेटणार.

आता मुव्ही झाल्यावर मग डिस्ट्रिब्युटरचा शोध सुरु होतो. डिस्ट्रिब्युटर हा त्यातली त्यात सर्वात हुशार माणूस . कोणता सिनेमा किती मध्ये बनलाय, किती मध्ये विकत घ्यायला परवडेल याचा ठीकठाक अंदाज लावून तो आपली ऑफर प्रोड्युसर महाशयांना देतो ..पण आमचा चित्रपट म्हणजे परीस आहे ..ते कमी किमतीत का द्यावे ? .. ह्या न्यायाने प्रोड्युसर महाशय अडून बसतात . आता आणखी एक गोष्ट, तुम्ही चित्रपटाला किती खर्च केलाय याचे डिस्ट्रिब्युटर ला काय घेणे देणे .. डिस्ट्रिब्युटर फक्त मार्केट व्हॅल्यू बघणार .. चित्रपटाची जाहिरात किती आहे , लोकांच्यामध्ये गॉसिप किती आहे बरोबर ? . .. अहो पण आमची शूटिंग चालू असताना आम्ही इतके सिक्रेट पाळलेले असतात कि एक फोटो सुद्धा आमचा कलाकार परवानगी शिवाय शेअर करू शकत नाही .. कसली डोमल्याची पब्लिसिटी होणार ? मग असा चित्रपट ज्याला ना स्टोरी आहे , ना ज्याचा ऑडियन्स डिफाइन आहे .. ( म्हणजे ना ग्रामीण , ना शहरी, ना तरुण , ना वयस्कर लोक ) कमी भावात डिस्ट्रिब्युटर मागतात आणि प्रोड्युसर तो देत नाही , कारण मराठीपण आणण्यासाठी आम्ही लावणी, पोवाडा यासाठी दाबून खर्च केलेला असतो.

पुढे मग कोणीतरी सांगते फिल्म फेस्टिवल ला लावा .. फिल्म फेस्टिवल मध्ये सेटिंग करून अवॉर्ड मिळवली जातात .. त्याची मात्र भरपूर जाहिरात केली जाते . आणि हा चित्रपट ऑस्कर लेवल पर्यंत जाईन.. सॉरी धडक मारिन .. असे काय तरी वातावरण केलं जात . पुढे परत एकदा डिस्ट्रिब्युटर सोबत मीटिंग होते आणि डिस्ट्रिब्युटर सांगेन तसे त्यात कमर्शिअल बदल केले जातात .. म्हणजे लावणी वाढवा, हा सीन काढा .. मग धड ती आर्ट फिल्म पण राहत नाही आणि धड कमर्शिअल पण राहत नाही . गाढव आणि घोडा यांच्या संकरातून निर्माण झालेले खेचर बनून जाते … मग डिस्ट्रिब्युटर ती फिल्म पडेल भावाला विकत घेतो आणि थिएटरला लावतो..

अनुदान मिळेल तेव्हा मिळेल पण आता प्रोड्युसर अनुदानाच्या लॉलीपॉप मधून बाहेर आलेला असतो आणि आपला मुव्ही थिएटरला लागला म्हणून प्रोड्युसर, डायरेक्टर आणि ऍक्टर तेवढ्या कालावधीसाठी सगळे खुश होतात आणि पुढे प्रोड्युसर हा धंदा फसवा आहे, परत चित्रपट काढणार नाही अशी शपथ घेतो .

आणि मी एक प्रेक्षक , ज्याला पाठीचा कणा तुटेस्तोवर प्रायव्हेट कंपनी मध्ये काम केल्यावर केवळ मराठी आहात म्हणून आमचा मराठी सिनेमा बघा हा सल्ला सुद्धा ऐकावासा वाटत नाही . ३ तास कुठेतरी आपल्या रेग्युलर कामाच्या टेन्शन मधून विरंगुळा म्हणून अशा चित्रपटाचे तिकीट न काढता मी त्यातल्या त्यात हिंदी ज्याचे नाव , स्टारकास्ट ,गाणी ऐकली आहेत अशा एखाद्या हिंदी चित्रपटाचे तिकीट काढतो.

?पोस्ट आवडली तर लाईक करा.. बिनधास्त शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply