मनसेच्या त्या सहा नगरसेवकांचे भवितव्य ठरवणार ‘ ही ‘ तारीख

By | November 7, 2017

future of manse nagarsevak will be decided on 14 november

मनसेने ‘शेलक्या’ शब्दात उपमा दिलेले आणि मनसे ला जय महाराष्ट्र करून शिवसेनेत जाणारे नगरसेवक शिवसेनेत अखेर आले असले तरी कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे .हे सहा नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधनातही अडकले, मात्र मनसेने आक्रमक होत कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. आता या पेचावर १४ नोव्हेंबरला फैसला होणार आहे.

मनसेतून शिवसेनेत पोहोचलेल्या या सहा नगरसेवकांची येत्या १४ नोव्हेंबरला कोकण विभागीय आयुक्तांसमोर सुनावनी होणार असल्याचे समजते. मनसेच्या तक्रारीची दखल घेऊन ही सुनावणी ठेवण्यात आली आहे. ह्या फुटीर नगरसेवकांची कोंडी करण्यासाठी मनसेने पुढाकार घेत कोकण विभागीय आयुक्तांशी तक्रार व पुढे पत्र व्यवहार देखील केला. ह्या सहा पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना पालिकेतील कोणत्याही समित्यांच्या बैठकांमध्ये प्रवेश देऊ नये, प्रस्तावावर मतदान करण्यापासून बंदी घालावी, त्यांचे पालिकेतील सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी मनसेची मागणी आहे. मात्र आता या सर्वांचे भवितव्य कोकण आयुक्तांच्या निर्णयावर अवलंबून असल्याने आता पुढे काय होणार याने शिवसेना देखील अस्वस्थ आहे.

भांडुपमधील पोटनिवडणुकीतील विजयामुळे मुंबई महापालिकेतील सत्तेचा काटा भाजपकडे झुकत असताना शिवसेनेने अचानक सर्वांनाच हादरा देत मनसेचे तब्बल ७ नगरसेवक फोडले आणि मुंबई महापौर पदाच्या भाजपच्या स्वप्नांना धुळीस मिळवले . त्यामुळे मनसे सोबतच भाजप देखील शिवसेनेवर खार खाऊन आहे . फोडाफोडीच्या राजकारणामुळे मनसेची वाताहत झाली असतानाच भाजपचे सत्तास्थापनेचे स्वप्न देखील भंगले होते.

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी तर ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना शिवसेनेवर धक्कादायक आरोप केला होता , ते म्हणाले , माफियांकडून मिळालेल्या पैशांमधून शिवसेनेने नगरसेवकांची खरेदी केली आहे तसेच पोटनिवडणुकीतील भाजपचा विजय शिवसेनेच्या जिव्हारी लागला असून, त्यामुळे त्यांनी माफियांच्या पैशाने नगरसेवक खरेदी केले आहेत .

महापालिका निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपला ८२ जागा मिळाल्या. सेनेला चार अपक्षांचा पाठिंबा असून भाजपला एक अपक्ष आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांचा पाठिंबा आहे. पुढे भांडुप पोटनिवडणुकीतील विजयाने भाजपचे संख्याबळ एकने वाढले, भाजप डोईजड होऊ शकेल त्यामुळे शेवटी मनसेचे सहा नगरसेवक आपल्या बाजूला वळवले. त्यामुळे सेनेचे संख्याबळ तब्बल ९४ वर पोहोचणार आहे.

मुंबई महापालिकेतील एका मोठ्या पक्षाकडून नगरसेवकांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असून यासाठी या नगरसेवकांना कोट्यवधी रूपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत, असा दावा सोमय्या यांनी केला होता.

अर्थात ही गोष्ट आता थोडी जुनी झाली असली तरी, ह्या नगरसेवकांचे भवितव्य मात्र टांगणीला लागले आहे हे नक्की.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?