फेरीवाले देखील पेटले : मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना जबर मारहाण

By | October 28, 2017

sanjay nirupam challages manse workers in mumbai

मुंबईतील मालाड पश्चिम मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनी हा हल्ला केल्याची शक्यता आहे. फेरीवाल्यांनी रॉडने सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला केला असल्याचे बोलले जातंय.. मालाड रेल्वे स्थानकानजीक आज दुपारी 3.30 वाजता हा हल्ला झाला. हल्ल्यात सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हल्ला होण्याआधी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची सभा मालाडमध्ये झाली होती . त्या सभेत संजय निरुपम यांनी चेतावल्यामुळेच फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केला आहे. याचे गंभीर परिणाम आता मुंबईभर पहायला मिळतील असा इशारा संदीप देशपांडे यांनी संजय निरुपम यांना दिला आहे.

मालाड पश्चिम येथील सभेत संजय निरुपम म्हणाले होते कि , ‘फेरीवाल्यांविरोधातील कारवाई ही पालिका प्रशासन, फडणवीस सरकार आणि मनसे यांची मिलीभगत आहे. माझे पोलिसांना सुद्धा सांगणे आहे की, या गरीब फेरीवाल्यांना जर कोणी मनसेचे फालतू गुंड त्रास देत असतील, दादागिरी करत असतील, तर त्यांना अडवा. त्यांच्यावर कठोर कारवाई करा. जर या गरीब फेरीवाल्यांना पोलिसांचे संरक्षण मिळाले नाही, त्यांना जर मारहाण होत राहील. तर ते कायदा हातात घेतील. रस्त्यावर उतरतील, मग कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल आणि त्याची जबाबदारी फक्त तुमच्यावर असेल’.

ह्या सभेनंतरच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे , संजय निरुपम यांनी मनसेचे कार्यकर्ते हफ्ता मागत होते, शेवटी वैतागून फेरीवाल्यांनी हल्ला केला. मनसेने गुंडागर्दी सुरु केली आहे, मनसेने कायदा हातात घेतल्यानेच असे प्रकार होत असल्याचे संजय निरुपम यांचे म्हणणे आहे.

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट रेल्वे स्टेशनपर्यंत मोर्चा काढून रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले होते . मनसे कार्यकर्त्यांनी देखील फेरीवाल्यांचे मारहाण केल्याचे प्रकार घडले होते . फेरीवाल्यांचा माल देखील रस्त्यावर फेकून देण्यात आला होता . राज ठाकरे यांनी मात्र फेसबुकच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांचं समर्थन केलं होतं.

अधिकृत कायदेशीर मार्गाने फेरीवाले हटवावेत यासाठी फक्त निवेदने देणे सोडून इतर काहीही प्रयन्त न करता झुंडशाही व गुंडगिरीच्या माध्यमांतून मनसेकडून फेरीवाल्यांना मारहाण आणि धमकावण्याचे प्रकार आधीही घडले आहेत.शेवटी संजय निरुपम यांच्या विखारी भाषणाने फेरीवाल्यांमध्ये हवा भरण्याचे काम केले आणि आजची ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे संजय निरुपम हे आधी शिवसेनेत होते आणि यांना मोठे करण्यात ठाकरे कुटुंबियांचे योगदान राहिले आहे.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?