नागपुरमध्ये हल्दीरामच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न अयशस्वी

By | July 3, 2018

failed attempt to kidnap haldiram owner

नागपूर येथील नामवंत उद्योजक आणि हल्दीरामचे मालक राजेंद्र अग्रवाल यांच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या तसेच त्यांच्याकडून ५० लाखांची खंडणी वसुलण्याचा कट रचणाऱ्या पाच आरोपींना धंतोली पोलिसांनी अटक केली. आरोपींचा एक साथीदार फरार आहे.

२८ एप्रिल २०१८ ला राजेंद्र अग्रवाल त्यांचा वाहनचालकासोबत शनी मंदिरात दर्शनाला आले होते. दर्शन आटोपल्यानंतर तेथील भाविकांना ते प्रसाद वाटत होते. गर्दी झाल्यामुळे त्यांनी प्रसाद वितरणाची जबाबदारी वाहनचालकावर सोपवली आणि ते वाहनात जाऊन बसले. अचानक चार ते पाच जण वाहनचालकासोबत झोंबाझोंबी करू लागले. वाहनचालक धष्टपुष्ट असल्याने त्याने त्या चार पाच जणांनाही हुसकावून लावले. दरम्यान, आरोपींनी शिवीगाळ करून खंडणीबाबत वाच्यता केल्याने हा अपहरणाचा प्रयत्न होता, असे अग्रवाल यांच्या लक्षात आले. त्यामुळे अग्रवाल यांच्यावतीने वाहनचालकाने धंतोली ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली. पुढे दोन महिने निघून गेले. २८ जूनला अपहरणकर्त्यांनी राजेंद्र अग्रवाल यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क करून त्यांना धमकावणे सुरू केले. ‘२८ जूनला तू बचावला. ५० लाखांची खंडणी दिली नाही तर तू आता वाचणार नाही’, अशी धमकीही आरोपी देत होते. अग्रवाल फोन कापत असल्यामुळे आरोपींनी त्यांना अत्यंत घाणेरड्या भाषेत मेसेज पाठविला. त्यांनी हा प्रकार धंतोली पोलिसांना कळविला. वरिष्ठांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली.

आरोपींनी ज्या मोबाईलचा वापर केला. त्या मोबाईलधारकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या व्यक्तीने आपला मोबाईल चोरीला गेला होता, त्याची तक्रारही त्याने पोलिसांकडे यापूर्वी नोंदविल्याचे सांगितले.त्याच्या आधारे पोलिसांनी त्या मोबाईलच्या आधारे पुन्हा काही नंबर मिळवले. त्यातील एक मोबाईल नंबर पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०, रा. हिवरीनगर) याचा असल्याचे आणि तो संबंधित मोबाईल वापरणाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पप्पू ऊर्फ श्यामबहादूर हा मूळचा रायबरेलीचा आहे. आधी तो अग्रवाल यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करायचा. त्याची गुन्हेगारी वृत्ती लक्षात घेऊन त्याला २०१४ मध्ये काढून टाकण्यात आले होते. त्याचा राग धरून तो काही जणांना हाताशी धरून हे उद्योग करत होता.त्याने आपणच अपहरणाची टीप दिल्याचे केले. आरोपी सौरभ भीमराव चव्हाण (वय २१), रोहित राजेंद्र घुमडे (वय २९), अतुल गोपाळ पाटील (वय २४), विनोद भूमेश्वर गेडाम (वय २३) अशी यांची नावे असून सर्व जण सध्या पोलीस कोठडीत आहेत.