एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी, 15 जण चेंगरून ठार

By | September 29, 2017

मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत तब्बल 15 जण चेंगरून ठार झाले असून, 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.

एकूण ३० पेक्षा जास्त जण जखमी झाले असून यांना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे .
.
आज शुक्रवारी (29 सप्टेंबर) सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली आहे. पूल पडत असल्याची आणि त्यात शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली . यावेळी पुलावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाली.

अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. वाहतूक आणि प्रवाशांसाठी हा पूल तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पूल पडल्याच्या किंवा शॉर्ट सर्किटच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने परळ येथे कोट्यवधी खर्च करून पादचारी पूल उभारला आहे. हा पूल दादरच्या दिशेला जाणारा आहे. या पुलाचा वापर होणार नाही, त्यामुळे हा पैशांचा अपव्यय ठरेल, अशी प्रतिक्रिया स्थानिकांसह नागरिकांनी दिली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या प्रतिक्रियांना केराची टोपली दाखवून पूल उभारला. यामुळे मुंबई दिशेकडील पुलावरील प्रत्यक्ष गर्दी जैसे थेच राहिली होती.