बाबावाचून करमेना : मीडिया पोलिसांना संपवून टाकण्याची धमकी

By | September 28, 2017

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिमला दोन साध्वी वर बलात्काराच्या गुन्ह्याखाली २० वर्षांची शिक्षा झाली आहे. सूंभ जळाला तरी पीळ जात नाही अशी बाबाच्या भक्तांची अवस्था आहे . डेरा सच्चा सौदाच्या ‘कुर्बानी आघाडी’ने पत्रकार, हरयाणातील काही पोलीस अधिकारी आणि डेरा सच्चा सौदाचे माजी अनुयायी ज्यांनी बाबाच्या विरोधात आवाज उठवून बाबाला आत पाठवले, त्या सर्वाना आम्ही संपवून टाकू अशी धमकी पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे .

डेरा सच्चा सौदाच्या ‘कुर्बानी आघाडी’च्या पत्रांमध्ये काही वृत्तवाहिन्यांच्या नावांचा उल्लेख आहे . केंद्रातील आणि हरयाणातील भाजप सरकारने राम रहिम यांची फसवणूक केली असे या पत्रात म्हटले आहे. ‘डेरातील किमान २०० मुले राम रहिम यांच्यासाठी प्राणांची बाजी लावायला तयार आहेत. राम रहिम यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या, त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या सर्वांना धडा शिकवला जाईल. याचा बदला डेऱ्यातील २०० मुलांकडून घेतला जाईल,’ असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. चंदिगढमध्ये बऱ्याच प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांना डेरा सच्चा सौदाकडून टपालाने धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे.

डेरा सच्चा सौदाने या आधीहि त्यांच्या मुखपत्रातून अनुयायांना भडकावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कायद्यापुढे भक्तांची काही डाळ शिजली नाही. ह्या पत्राची सत्यता पडताळून पाहण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. राम रहिम सध्या रोहतकमधील तुरुंगात आहे. तर त्याची मानलेली मुलगी हनीप्रीत मात्र अद्याप फरार आहे .

बाबाला शिक्षा झाल्यावर पंचकुलासह हरयाणातील अनेक भागांमध्ये हिंसाचार उसळला होता. राम रहिमच्या अनुयायांनी केलेल्या हिंसाचारात सरकारी आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान डेरा सच्चा सौदाच्या मालकीच्या संपत्तीतून वसूल करण्याची मागणी करण्यात आली असून सरकारही त्यास अनुकूल आहे .

बाबा आत गेल्यापासून बाबाचा विरह कित्येक भक्तांना सहन होत नसून, बाबा गुरमीत व डेरा च्या नावाने युट्युबवर बाबाच्या समर्थनार्थ काही जणांनी चॅनेल सुरु केले असून, त्यातून मीडिया,सरकार व पोलिसांनी बाबावर कसा अन्याय केलाय याचेच पाढे वाचले जात आहेत . अर्थात न्यायालयाने दोषी ठरवले तरी व्यक्तिपूजेच्या मानसिकतेतून आपला समाज बाहेर येत नाही हेच खरे ..

?पोस्ट आवडली तर लाईक करा ..शेअर करा ?