कोण लागतो हा उमर खालिद तुमचा ? उमर खालिदचा पायचाटेपणा करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा

By | January 14, 2018

shivsena targets prakash ambedkar over umar khaledin yalgaar parishad

आज संक्रांतीचा मुहूर्त साधून सामनामधून प्रकाश आंबेडकर यांच्या दुटप्पी भूमिकेवर हल्ला चढवण्यात आला. तसेच रोटी , कापड मकान ह्या विषयावर लोक आता पेटून उठत नाही ते आता राजकारण्यांनी हेरले आहे म्हणून जात मध्ये घालून राजकारण खेळले जात आहे . शनवारवाड्यासमोरील ‘एल्गार’ परिषदेस उमर खालिदला बोलावून आयोजकांनी कोणती क्रांती केली? कोण लागतो हा उमर खालिद तुमचा? असा प्रश्न देखील ह्या परिषदेच्या आयोजकांना विचारण्यात आला आहे . उमर खालेद जो अतिरेकी बुर्हाण वाणीचा समर्थक आहे तसेच भारत विरोधी घोषणा देण्यात सहभाग होता, त्याला ह्या परिषदेला बोलवायचे कारण तरी काय अशा शब्दात आज सामना मधून हल्लाबोल करण्यात आला आहे . तसेच केवळ हिंदुत्ववादी संघटनांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे देखील अन्याय असल्याचे म्हटले आहे.संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांचे नाव दंगलखोर म्हणून ज्यांनी घेतले त्या नेत्यांनी उमर खालिदचे नाव घेतले नाही, ही कसली धर्मनिरपेक्षता?

  • काय म्हणतॊ आजचा सामना (लेख सुरु )

भीमा-कोरेगावातून सुरू झालेली दंगल महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला कलंक आहे. या सगळ्यामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा आरोप केला जात आहे, पण शनवारवाड्यासमोरील ‘एल्गार’ परिषदेस उमर खालिदला बोलावून आयोजकांनी कोणती क्रांती केली? कोण लागतो हा उमर खालिद तुमचा?

भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा मुखवटा गळून पडला आहे. देशाचा ‘सेक्युलर’ म्हणजे धर्मनिरपेक्ष ढाचा व फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे पुरोगामित्व ‘नकली’ ठरवले आहे. जातीय व धार्मिक स्वार्थाचे राजकारण आता सगळ्यांनाच करायचे आहे. ‘रोटी-कपडा-मकान’ या प्रश्नावर लोक आता उसळून उठत नाहीत. शेतकरी, बेरोजगारी हे प्रश्न त्यांना महत्त्वाचे वाटत नाहीत. देशाच्या सीमांवर रोज होणाऱ्या चकमकी व सैनिकांच्या मृत्यूंवरही त्यांचे रक्त सळसळत नाही, पण जात व धर्माच्या अस्मितेसाठी सर्वच ‘जात’वाले रस्त्यावर उतरतात व माणसांना मारतात, जाळतात. हे लक्षण अराजकतेच्या धोक्याची घंटा वाजवणारे आहे!

का मारले ?
नितीन फटांगळे या तरुणास भीमा-कोरेगावात दगडाने ठेचून मारले. घरात नळाची दुरुस्ती करण्यासाठी त्याला काही सामान हवे होते ते आणण्यासाठी तो बाजारात गेला. तोपर्यंत गावात हिंसाचाराची सुरुवात झाली होती. नितीनच्या अंगावर जे ‘टी शर्ट’ होते त्यावर छत्रपतींचा फोटो होता व त्यामुळे एका जमावाने त्या निरपराध तरुणाची हत्या केली. हे जर खरे असेल तर राज्यात नेमके कोणते विष भिनले आहे ते समजून येईल. पाकिस्तानातील अतिरेक्यांनाही जे जमले नाही तो विध्वंस आता आपला आपणच करून घेत आहोत. हाफिज सईदला जे अशक्य आहे ते भीमा-कोरेगाव घटनेने ‘शक्य’ केले व आपणच महाराष्ट्राच्या एकतेच्या डोक्यात खिळा मारून घेतला. महाराष्ट्रात आज अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत व त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. महाराष्ट्रातील ‘बौद्ध’ बांधवांना गुजरातचा जिग्नेश मेवानी व दिल्लीचा बदफैली उमर खालिदचे नेतृत्व मान्य आहे काय? याचा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी प्रामुख्याने करायला हवा.

हे शौर्य कसले?
भीमा-कोरेगावच्या दंगलीत हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा आरोप श्री. शरद पवारांपासून प्रकाश आंबेडकर करतात तेव्हा आश्चर्य वाटते. मग भीमा-कोरेगावच्या ‘शौर्य’दिनी उमर खालिद नावाच्या महात्म्यास ज्यांनी आमंत्रित केले ते शौर्य होते की देशद्रोह? दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ‘देशद्रोहा’चे एक प्रकरण गाजले. त्यात कन्हैयाकुमार व उमर खालिद हे आरोपी होते. विद्यापीठात संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूचा स्मृतिदिन साजरा करण्याचे ‘कार्य’ याच उमर खालिदने पार पाडले. ‘पाकिस्तान झिंदाबाद’, ‘भारत तेरे तुकडे होंगे’, ‘भारत की बरबादी तक जंग’ अशा विखारी घोषणा देण्यात आल्या व त्याचे नेतृत्व उमर खालिदने केले. असा हा उमर खालिद कुणाच्या निमंत्रणावरून पुण्याच्या एल्गार परिषदेस आला? संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांचे नाव दंगलखोर म्हणून ज्यांनी घेतले त्या नेत्यांनी उमर खालिदचे नाव घेतले नाही, ही कसली धर्मनिरपेक्षता?

गुलामांचे राज्य
ज्यांनी खालिद उमरचा पायचाटेपणा केला, त्यांच्यावर आधी देशद्रोहाचे गुन्हे दाखल व्हायला हवेत. ‘हिंदुस्थानी लष्कराशी झालेल्या चकमकीत ठार झालेला दहशतवादी बुऱहान वाणी हा ‘शूर’ होता. बुऱहान वाणी हा मृत्यूला घाबरणाऱ्यांपैकी नव्हता. त्याला भय हे गुलामगिरीत जगण्याचे होते,’ असे उमर खालिद म्हणतो. म्हणजे तो सरळ सरळ पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाला पाठिंबा देतो आणि हाच उमर खालिद ब्रिटिशांनी उभारलेल्या शौर्यस्तंभास अभिवादन करण्यासाठी बोलावला जातो. त्यामुळे सर्वात आधी ‘गुन्हा’ दाखल व्हायला हवा उमर खालिदच्या महाराष्ट्रातील यजमानांवर! मग इतर सगळय़ांवर. पण या ढोंगाचा बुरखा कितीजणांनी फाडला? श्री. प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव लढ्याचे ‘पुढारी’पण स्वीकारले. हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील, असे एक भयंकर विधान त्यांनी केले; पण उमर खालिदचा खरा ‘बाप’ हाफिज सईद आहे याचा विसर त्यांना पडला. दंगलीच्या दिवशी संध्याकाळी श्री. आंबेडकर हे अर्णव गोस्वामींच्या ‘डिबेट’ कार्यक्रमात सहभागी झाले. गोस्वामी यांनी आंबेडकर यांना पहिलाच प्रश्न विचारला तो असा – ‘‘मि. आंबेडकर, उमर खालिद हा माणूस देशाच्या सर्वोच्च संसदेवर अतिरेकी हल्ला करून सुरक्षा रक्षकांचा बळी घेणाऱया अफजल गुरूचा समर्थक होता आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये देशद्रोही घोषणा देणाऱया विद्यार्थ्यांचा तो नेता होता आणि अत्यंत चिथावणीखोर व देशद्रोही घोषणा देणाऱ्यांमध्ये तो आघाडीवर होता. या दोन गोष्टींशिवाय त्याच्या नावावर तिसरा कोणताही ‘पराक्रम’ रजिस्टर नाही. मग अशा इसमामध्ये तुम्ही अशी कोणती गोष्ट बघितली की, शनवारवाड्यासमोर झालेल्या ‘एल्गार’ परिषदेमध्ये त्याला तुम्ही प्रमुख वक्ता म्हणून सन्मानाने आमंत्रित केले होते!
प्रकाश आंबेडकर या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत!

नवा एल्गार
शनवारवाड्याच्या ‘एल्गार’ परिषदेचेच पडसाद भीमा-कोरेगावात उमटले. दिल्लीत चार दहशतवादी पकडले व २६ जानेवारीस स्वातंत्र्यदिनी होणाऱया हल्ल्याचा कट उधळून लावला असे सांगण्यात आले, पण महाराष्ट्रातील जातीय दंगलींचा ‘कट’ पोलिसांना उधळून लावता आला नाही. ज्या महाराष्ट्रात डॉ. आंबेडकर जन्मास आले त्या महाराष्ट्रातील ‘बौद्ध’ समाजास गुजरातचे मेवानी व पाक समर्थक खालिद उमरचे नेतृत्व प्रिय वाटत असेल तर तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव ठरेल, याचा विचार कोणी करणार की नाही? या सर्व प्रकारानंतर महाराष्ट्रातील मने दुभंगली आहेत व कटुता वाढली आहे. हे चित्र पाहून पाकिस्तानात बसलेला हाफिज सईद टाळय़ा वाजवीत असेल.

महाराष्ट्राचे भविष्य अंधकारमय करणारे भीमा-कोरेगावचे प्रकरण आहे. महार रेजिमेंटने पेशव्यांविरुद्ध युद्ध जिंकले. पेशवे इंग्रजांविरुद्ध हरले. इंग्रजांनी देश गुलामीच्या बेड्यात जखडवला व दीडशे वर्षे आपण पारतंत्र्यात राहिलो. त्या ‘शौर्या’चा एल्गार पेटविण्यासाठी आमंत्रित केले खालिद उमरला!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रहिताला महत्त्व दिले. राष्ट्रहितास बाधा येईल असे त्यांनी काही केले नाही. आंबेडकरांचे महात्मा गांधींशी मतभेद होते. म्हणून त्यांनी बॅ. मोहम्मद अली जीनांची पालखी वाहिली नाही व हिंदुस्थानातील जातीयवादाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी पाकिस्तानची मदत घेतली नाही. उमर खालिदसाठी शनवारवाड्यांसमोर पायघड्या घालणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. डॉ. आंबेडकर हे भीमा-कोरेगावच्या शौर्य स्मारकास कधी भेट देण्यासाठी गेले होते काय? तसा पुरावा नसल्याचे मी मागच्या रविवारी याच संदर्भात म्हटले होते. ते विधान चुकीचे ठरविणारे पुरावे काही मंडळींनी माझ्याकडे पाठवले. मी त्यांचा आदर करतो. सुशील म्हस्के यांनी एक छायाचित्र पाठवले. त्यात डॉ. आंबेडकर हे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे आहेत. ‘‘आपले खापर सासरे शिवराम जानबा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मानवंदना दिली. अजून पुरावे पाहिजे असतील तर तेदेखील आहेत,’’ असे श्री. म्हस्के म्हणतात. त्यांच्यासह सगळ्यांच्याच भावनेचा मी आदर करतो. डॉ. आंबेडकर हे त्यांच्या सहकाऱ्यांसह भीमा-कोरेगावच्या स्मृतिस्तंभावर गेले व मानवंदना दिली, पण शौर्याचा व अस्मितेचा एल्गार पेटविण्यासाठी त्यांनी एखाद्या उमर खालिदला आमंत्रित केले नव्हते.

हा उमर खालिद तुमचा-आमचा कोण लागतो?

या प्रश्नाचे उत्तर कोणी द्यायचे?  (लेख समाप्त )

हिंदूंमधील हाफिज सईद याचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा ? : काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

जिग्नेशचे बालिश राजकारण..असे किती आले किती गेले : प्रकाश आंबेडकर

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत लपवलेली ‘ ही ‘ गोष्ट तुमच्या लक्षात आली का ?

लेख नक्की वाचा : निखिल वागळे यांच्या मुलाखतीमधून कसा खोटारडेपणा आणि लपवाछपवी

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा