नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट : मात्र अजूनही स्फोटाचे गूढ कायम

By | October 7, 2017

नाशिक शहरातील शरणपूर भागात महापालिकेच्या तिबेटीयन मार्केटमध्ये शनिवारी सकाळी 5 वाजण्याच्या एक मोठा स्फोट झाला. प्रथमदर्शनी हा स्फोट अवैधरित्या गॅस भरण्यासाठी केलेल्या सिलिंडरच्या गळतीमुळे झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ज्या गाळ्यात हा स्फोट झाला तिथे हा सिलिंडर आढळून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे . गाळ्याचा मालक हा सिन्नर येथे राहणारा असून आजूबाजूच्या लोकांनी व कामगारांनी सर्वप्रथम त्याला घटनेची माहिती कळवली, अशी माहिती समोर आली आहे. पण स्फोटानंतर तब्बल तासाभराने पोलिसांना माहिती मिळाली. यामुळे घटनेमागील संशय अधिक वाढला आहे.

असा झाला घटनाक्रम

शरणपूर रोड परिसरात असलेल्या तिबेटीयन मार्केटमध्ये शनिवारी पहाटे 5 वाजता घडलेला स्फोट व त्याची तीव्रता बघता काही स्फोटक पदार्थ या ठिकाणी ठेवले होते का? याबाबत पोलीस चाचपणी करत आहेत.दुसरे असे कि पहाटे ५ ला झालेल्या स्फोटाची माहिती पोलिसांना एक तास उशिरा का कळवण्यात आली . पोलीस तपास यंत्रणा अद्याप स्फोटाची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे; मात्र यंत्रणेकडून अजून ठोस असे काही सांगण्यात आलेले नाही . या एक तासाच्या कालावधीत नेमके काय घडले आता या दिशेने पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी तपास करत आहेत.

ह्या एक तासामध्ये दुकान मालकाच्या सांगण्यावरून काही पुरावे लपवले गेले का? ही देखील पोलीस पडताळून पाहत आहेत. एकूणच 5 तास उलटूनही अद्याप पोलीस, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक-नाशक पथक, न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा पथक अशी सर्वच यंत्रणा प्रयत्न करत असून स्फोट नेमका कशाचा झाला? या शोध घेतला जात आहे. 5 तास उलटले असूनही अद्याप पोलिसांच्या हाती धागेदोरे सापडलेले नाहीत .