हिंदू पाकिस्तानच्या टीकेने भाजपचा थयथयाट : शशी थरूर यांची टीका झोंबली

By | July 12, 2018

bjp angry over hindu pakistan

हिंदू पाकिस्तान वरून शशी थरूर यांची टीका भाजपाला चांगलीच झोंबली आहे . त्यावरून आता शशी थरूर हे भाजपच्या रडारवर आले आहेत . शशी थरूर यांनी अल्पसंख्यांकांच्या मतपेढीला डोळ्यासमोर ठेवून थरुर यांनी हिंदूंची बदनामी केल्याची टीका भाजपानं केली आहे. तर कायमच मोदी यांची री ओढणारे संबित पात्रा यांनी यांचे कनेक्शन मोदी यांच्याशी जोडत, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधण्यासाठी काँग्रेसकडून लोकशाहीवर हल्ला केला जात असल्याचं म्हटलं आहे. थरुर यांचं विधान समस्त हिंदूंवरील हल्ला असल्याचे नेहमीचे पालुपद देखील वाजवायला संबित पात्रा विसरले नाहीत. त्यामुळे नेहमीप्रमाणे थरूर यांना हिंदुद्रोही,पुढे जाऊन राष्ट्रद्रोही असे नेहमीचे भाजपचे उद्योग सुरु झाल्यास त्यात नवल नाही .

  • नेमके काय म्हणाले होते शशी थरूर ?

आगामी लोकसभा निवडणूक भाजपानं जिंकल्यास भारताचा हिंदू पाकिस्तान होईल, अशी भीती शशी थरुर काल तिरुअनंतपुरममधील एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. भाजपाला मात्र ही टीका सूटबूट कि सरकार पेक्षाही जास्त झोंबल्याचे दिसत आहे कारण ह्या एका वाक्याने भाजपच्या मर्मावरच शशी थरूर यांनी बोट ठेवले आहे . दुसरीकडे शशी थरुर त्यांच्या विधानावर ठाम आहेत. उलट त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाजपावरील हल्ला आणखी तीव्र केला आहे. ‘मी आधीही हे म्हटलं आहे आणि मी पुन्हा तेच म्हणेन. पाकिस्तानचा जन्म एका विशेष धर्माच्या लोकांसाठी झाला. पाकिस्तानमध्ये कायम अल्पसंख्यांकांना अधिकार नाकारण्यात आले. त्यांनी कायम अल्पसंख्यांकांसोबत भेदभाव केला. भारतानं कधीच असं केलं नाही. भारतानं धर्माच्या आधारे कधीही कोणासोबत भेदभाव केला नाही,’ असे देखील शशी थरूर यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे.

संघ आणि भाजपाचा हिंदू राष्ट्राचा विचार पाकिस्तानच्या विचारसरणीचं प्रतिबिंब आहे. ज्या देशात बहुसंख्यांकांना महत्त्व दिलं जाईल आणि अल्पसंख्यांकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात येईल, तो देश हिंदू पाकिस्तान असेल. आम्ही यासाठी स्वातंत्र्य लढा दिला नव्हता. भारताची अशी व्याख्या आपल्या घटनेनदेखील केलेली नाही,’ असं थरुर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.शशी थरूर यांनी भाजपच्या मुख्य विचारसरणीवर ( हिंदू राष्ट्र ) हल्ला केला असल्याने भाजपचा तिळपापड झालेला आहे . आता शशी थरूर यांना यापुढे देखील जास्त लक्ष केले जाण्याची शक्यता आहे.