पाकिस्तानातील बलोच मराठा आणि हरियाणातील रोड मराठा यांची महत्वपूर्व ऐतिहासिक माहिती

By | January 13, 2018

baloch maratha people from balochistan story in marathi

बलुचिस्तान हे पाकिस्तानचे सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले राज्य आहे . पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा असेलेले बलुचिस्तान हे राज्य म्हणजेच जवळजवळ निम्मा पाकिस्तान आहे . खनिजे आणि गॅस यांचे सर्वात मोठे भांडार इथे आहे . मात्र त्या तुलनेत येथील लोकांना पाकिस्तानकडून कोणत्याही सुविधा देण्यात येत नाही . लाईट पाणी रस्ते अशा मूलभूत सुविधांपासून देखील ह्या लोकांना पाकिस्तानच्या पंजाबी बहुल समाजाने दुर्लक्षलेलं ठेवले आहे . यावरून हद्द म्हणजे पाकिस्तानच्या शालेय पुस्तकांमध्ये बलोची लोकांबद्दल विष कालवले जाते . बलोच म्हणजे आजचे पाकिस्तानीच असलेले लोक हे रानटी व मागासलेले आहेत असे शालेय पुस्तकांमधून शिकवणारा बहुदा पाकिस्तान हा एकमेव देश असावा. ज्यावेळी पाकिस्तान देश तयार झाला तेव्हा बलोचिस्तानचा त्यात समावेश नव्हता मात्र पाकिस्तान सैन्याने हल्ला करत बलोच लोकांवर अत्याचार करत बलुचिस्तान हा मुस्लिम बहुल आहे म्हणून त्याचा पाकिस्तानमध्ये समावेश करून घेतला. बलोच लोकांची इच्छा नसताना देखील पाकिस्तान यामध्ये समावेश केल्याने बलोच लिबरेशन आर्मी (BLA) नावाची एक संघटना पाकिस्तान सैन्याशी गेली कित्येक वर्षे झुंज देत आहे . त्यात पाकिस्तानी सैन्याशी लढताना कित्येक बलोच नागरिक ठार झाले आहेत तर कित्येक जण पाकिस्तानी सैन्याकडून गायब केले गेले आहेत . त्यांचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही .

अर्थात ह्या बलोच लोकांचे आपल्या महाराष्ट्रातील लोकांशी देखील एक कनेक्शन आहे. ह्या लेखात मराठा हा उल्लेख फक्त महाराष्ट्रातील सैन्य अशा अर्थाने केला आहे ,जातीचा असा नाही .त्यासाठी आपल्याला पानिपतच्या युद्धाचा इतिहास पाहावा लागेल. पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता अडीचशे वर्षे उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या युद्धात जवळपास चाळीस हजार मराठी योद्धे, तसेच स्त्रिया व पुरुष मरण पावले आणि २२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले. हे युद्ध मराठे हरले असे म्हटले जात असले तरी मराठ्यांसोबत लढून अहमदशहा अब्दालीला देखील काही विशेष आर्थिक लूट मिळाली नाही. मात्र अब्दालीला हे युद्ध लढण्यासाठी त्यावेळी असलेल्या बलोच सरदाराने मदत केली होती. बलोच सरदाराने अब्दालीला सैनिक द्यायचे आणि त्या बदल्यात अब्दालीने भारतातून आणलेली आर्थिक लूट बलोच सरदाराला द्यायची असे ठरले होते ,मात्र पानिपतच्या युद्धात अब्दालीला आर्थिक असा काहीच फायदा झाला नाही .मात्र मराठा युद्धकैदी त्याच्या ताब्यात होते . सततच्या लढाईमुळे हे मराठा सैनिक प्रचंड थकून गेलेले होते तसेच शारीरिक स्थिती देखील अत्यंत खराब होती . अशा परिस्थितीत हे सैन्य अफगाणिस्तानला नेण्याची जबाबदारी अब्दालीवर येऊन पडली होती. मात्र तो दिल्लीतून निघाला असता , त्याला हरियाणामध्ये मध्ये गाठण्यात आले आणि शीख बांधवांच्या सैन्याने अब्दालीवर हल्ला चढवला. काही आजारी पुरुष ,महिला आणि मुले यांची शीख बांधवांनी अब्दालीच्या तावडीतून सुटका केली. शीख बांधवानी सोडवलेला मराठी समुयाद तिथेच स्थायिक झाला. आज हे लोक हरियाणायामध्ये रोड मराठा ह्या नावाने ओळखले जातात. उरलेलं सैन्य घेऊन अब्दाली बलोचिस्तानला आला .

बलोच सरदाराला अब्दालीकडून मोठ्या पैशाची आशा होती मात्र अब्दाली मराठ्यांसोबत लढून कफल्लक झालेला होता . देण्यासारखे असे त्याच्याकडे काहीच राहिले नव्हते . अशा परिस्थितीमध्ये हे युद्धकैदी अफगाणिस्तानमध्ये कसे घेऊन जायचे याची त्याला चिंता भासत होती. शेवटी त्याने हे मराठा सैन्यच त्या सरदाराला देण्याची पेशकश केली आणि हे सर्व युद्धकैदी बलुचिस्तानमध्ये राहू लागले. त्यांची वर्गवारी करण्यात आली त्यात शाहू ( आज साहू म्हणतात ) ,पेशवाई ( आज पेशवाणी असे म्हणतात ) ,बुगटी, माझारी, रायसानी अशा विविध प्रकारात त्यांची कामानुसार वर्गवारी करण्यात आली. बलोच सरदार हे ह्या युद्धकैद्यांना अत्यंत क्रूर पद्धतीने वागवत असत .शेती कशी करतात याची ह्या युद्धकैद्यांना माहिती होतीच त्यांनी तेथील वाळवंटात देखील कालांतराने शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी पुढे इस्लाम धर्म कबूल केला मात्र आज देखील ते आपल्या नावापुढे मराठा हे उपनाव लावतात . १९४४ पूर्वी त्यांची मुख्य कामे म्हणजे उंटांची देखभाल करणे, स्वयंपाक करणे, लोहारकाम व इतर छोटी-मोठी कामे करणे हेच असे.

बलुची जमातीमधील जाचक कायद्याचा ह्या समाजाला देखील मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला.प्रत्येक बलुची जमातीमध्ये त्यांचे स्वत:चे असे कायदे (जिर्गा) असतात. पूर्वी मराठय़ांना इतर बुगटी जमातींच्या तुलनेत असमान आणि जाचक असे कायदे लागू होते. उदाहरणार्थ, सियाकारी- म्हणजे Honour killing च्या कायद्यानुसार एखाद्या बुगटी व्यक्तीने दुसऱ्या बुगटी व्यक्तीचा वध केला तर वध झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला वध केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला मारण्याची मुभा होती. परंतु एखाद्या बुगटी व्यक्तीने मराठा व्यक्तीचा वध केला तर वधास वध हा कायदा त्यांच्या बाबतीत मात्र लागू नव्हता. अपराधी बुगटी व्यक्तीला माफक दंड करून सोडून देण्यात येत असे. याउलट, एखाद्या मराठा व्यक्तीने बुगटी व्यक्तीचा खून केला तर एका वधास दोन वध- असा अत्यंत जाचक कायदा देखील होता.

१९४४ साली हा मराठा समाज गुलामगिरीतून मुक्त झाला व जिर्गातले असमान कायदेही काळानुरूप रद्द करण्यात आले.कारण ह्या भागावर इंग्रजांची देखील एकहाती सत्ता नव्हती . ते स्थानिक लोकांना हाताशी धरूनच राज्य करत होते . गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतरही काही काळ या वर्गाने त्यांच्या बुगटी मालकांबरोबरच राहणे पसंत केले. कारण इतकी वर्षे गुलामगिरीत राहिल्यानंतर त्यांच्यात एक कमीपणाची भावना निर्माण झाली होती. मात्र आज बलोच मराठा समाज शिक्षणात सर्वात पुढे असून , बलुचिस्तानमध्ये गॅस चे भांडार सापडल्यानंतर तिथे सुई पेट्रोलियम ह्या कंपनीची स्थापना करण्यात आली . ह्या कंपनीमध्ये देखील बलोच मराठा लोक मोठ्या प्रमाणात काम करतात .

आज हे मराठी सैनिक धर्माने मुस्लिम झाले असले तरी यांच्या लग्नातील विधी अजूनही मराठीच पद्धतीने केले जातात. उदा. घाना भरणे, हळद, नवऱ्या मुलाची लग्नाअगोदरची आंघोळ, लग्नात उपरण्याला बांधली जाणारी गाठ बहिणीने पैसे उकळल्यावरच सोडवणे, मानलेला भाऊ अशा पद्धती आज देखील आहेत . फक्त लग्नाचे मुख्य विधी हे इस्लामिक पद्धतीने केले जातात. अर्थात भारतातील मराठ्यांबद्दल किंवा त्यांच्या पूर्वजांबद्दल यांना काहीही माहिती नाही. पाकिस्तानमध्ये आज पेशवाणी, साहू अशी प्रोफाइल सापडतात मात्र त्यात मराठा नाव जर सोडले तर बाकी भारताशी त्यांचा कोणताही संबध नाही . शिवाजी महाराज यांचा फोटो देखील त्यांना ओळखता येत नाही किंवा हे कोण आहेत याचे उत्तर देता येत नाही. मात्र क्वचित काही जणांना थोडी माहिती आहे त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी आपला पाठिंबा दिला होता. अर्थात या पलीकडे ना भाषा , ना धर्म . ही गोष्ट पाकिस्तानी लष्कराला देखील ठावूक आहे , त्यामुळे ह्या देखील लहान गोष्टीचे भांडवल करून पाकिस्तानमध्ये बलोच समुदायास भारत धार्जिणे म्हणून त्रास दिला जातोय .आयएसआयकडून लोक गायब केले जात आहेत . चीन व पाकिस्तान निर्माण करत असलेल्या सीपॅकचा बराचसा भाग बलुचिस्तान मधून जातोय. अत्यंत कमी लोकसंख्या आणि खनिज व गॅसचे भरपूर प्रमाण यामुळे चीन व पाकिस्तान दोघेही मिळून ह्या भागाची लूट करत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये . चीनसोबत ग्वादार बंदर विकसित करून स्थानिक लोकांचा आवाज दडपण्याचा देखील प्रयत्न केला जातोय असे बलोच लोकांचे म्हणणे आहे .पाकिस्तानच्या ह्या ठिकाणी नुकताच चिनी चालनास देखील मान्यता देण्याचा प्रस्ताव आहे. चिनी भाषा शिकावी म्हणून शाळा काढण्यात येत आहेत . अशा परिस्थितीमध्ये हे लोक भारताच्या मदतीकडे डोळे लावून बसलेले आहे. पाकिस्तानच्या जुलमी राजवटीपासून त्यांना मुक्तता हवी आहे आणि यासाठी भारताने मदत करावी असा त्यांचा आग्रह आहे.

फँटममधील अफगाण जिलेबी हे गाणे देखील तेथिल बलोच सांस्कृतिक गाण्यावरून घेतले गेलेले आहे . पाकिस्तानातील एके काळी कट्टर महाराष्ट्रीयन असलेला बलोच समुदाय आज आपल्या अस्तित्वासाठी पाकिस्तानमध्ये मोठ्या लढत आहे. जरी हा समाज स्वत:ला ‘मराठा’ म्हणवत असला तरी तो महाराष्ट्रातील केवळ ‘मराठा’ या जातीशी संबंधित नाही. कारण पानिपतात अठरापगड जातीचे सैनिक व सरदार लढले होते, जे केवळ जातीने नाही तर महाराष्ट्रधर्म मानणारे मराठे होते हे लक्षात घेतले पाहिजे .

  • संबधित बातम्या

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

लेख नक्की वाचा : निखिल वागळे यांच्या मुलाखतीमधून कसा खोटारडेपणा आणि लपवाछपवी

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत लपवलेली ‘ ही ‘ गोष्ट तुमच्या लक्षात आली का ?

विनोदी_लेख : तैमूरला राष्ट्रीय बाळ घोषित केले तर राजकारणी काय प्रतिक्रिया देतील ?

बसल्या जागी मोबाईलला आधार कार्ड करा लिंक : ‘ ह्या ‘ सोप्या पद्धतीने

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा