पीक कर्जासाठी केली शरीरसुखाची मागणी : महाराष्ट्रातील निंदनीय प्रकार

By | June 23, 2018

asking for sexual pleasure for blood maharashtra

चित्र :प्रतीकात्मक

काही दिवसांपूर्वी रक्तासाठी शरीरसुखाची मागणी करण्याचा निंदनीय प्रकार महाराष्ट्रातील एका हॉस्पिटलमध्ये घडला होता. मात्र त्याहून देखील किळसवाणा प्रकार आणखी एकदा उघडकीस आला आहे . बँकेच्या शाखाधिकाऱ्याने पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी केल्याचा गुन्हा त्यावर नोंदवण्यात आला आहे . पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या तालुक्यातील (मलकापूर,बुलढाणा ) दाताळा येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यांविरुध्द संबधित महिलेच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ह्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संबंधित शाखाधिकारी सध्या फरार झाला आहे.

दाताळा गावातील शेतकरी त्याच्या पत्नीसोबत पिक कर्जासाठी गुरूवारी सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत गेला होता . कागदपत्रांची चाळणी करून बँक व्यवस्थापकाने त्यांचा मोबाईल नंबर मागितला .शेतकऱ्याकडे मोबाइल नसल्याने त्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्लील संभाषण करून शरीरसुखाची मागणी केली.

संबंधित महिलेने बँक व्यवस्थापकाशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डींग करून मलकापूर ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदविली. चौकशी अंती गुरूवारी रात्री महिलेच्या तक्रारीवरून सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरोधात अपराध नं. १०८ /१८ कलम ३५४ अ, (२), भादंवि, सहकलम ३ (१), (डब्ल्यू) (१),३ (१),(डब्ल्यू) (२) अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी गिरीश बोबडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोरी फरार आहेत.