अश्विनी बिद्रे यांच्या पतीने ‘ ह्या ‘ कारणावरून मागितली इच्छामरणाची परवानगी

By | March 20, 2018

ashwini gore is missing since last 18 months family blames seniors

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खूनप्रकरणी अपेक्षित गतीने तपास होत नसल्याने अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीसह इच्छामरणासाठी परवानगी मागितली आहे. राष्ट्रपती, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आणि राज्यपालांना हे पत्र पाठवले आहे. गुन्ह्यातील सबळ पुरावे जमा करण्यात पोलिसांकडून चालढकल सुरू असल्याने बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. योग्य पद्धतीने तपास न झाल्यास आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी असे देखील त्यांनी ह्या पत्रात म्हटले आहे .

‘पोलिसांची तपासातील टाळाटाळ आणि राज्य सरकारकडून योग्य दखल घेतली जात नसल्याने या गुन्ह्यात आम्हाला न्याय मिळेल याची खात्री वाटत नाही. राज्याच्या पोलिस महासंचालकांसह मुख्यमंत्र्यांनीही भेट घेणे टाळले. न्याय मिळवून देण्याऐवजी आमच्याच जिवाला धोका असल्याची भीती घातली जाते. माझी नऊ वर्षांची मुलगी रोज आई कधी येणार? असे विचारते. न्याय मिळवण्याच्या फरफटीत तिचे बालपण आणि आमचे कौटुंबिक स्वास्थ्य हरवले आहे. आणखी अन्याय सोसण्यापेक्षा आम्हा दोघांना इच्छामरणाची परवानगी द्यावी. आमच्या मरणोत्तर आमचे अवयवदान देखील करावे, अशी इच्छा देखील ह्या पत्रातुन व्यक्त करण्यात आली आहे.

अद्यापही पोलिस खात्यातील काही वरिष्ठ अधिकारी संशयितांना मदत करण्यात गुंतल्याचा बिद्रे-गोरे कुटुंबीयांचा आरोप आहे. ३१ जानेवारी, २०१७ मध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करण्याऐवजी गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याची मुभाच आरोपीला दिली, असे मत बिद्रे-गोरे कुटुंबीयांचे आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी निलंबित पोलिस निरीक्षक आहे. सत्तेतील पक्षाच्या माजी मंत्र्याचा भाचाही या गुन्ह्यात सहभागी आहे, त्यामुळे तपास यंत्रणेवर आणि फिर्यादींवर प्रचंड दबाव आहे. फिर्यादींनी तपासाचा पाठपुरावा करू नये, यासाठी त्यांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष धमकावले जाते. न्याय मिळत नसेल तर इच्छामरणावर ठाम असल्याचे राजू गोरे यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

संशयितांवर गुन्हा दाखल होऊन ११ महिने उलटल्यानंतर वारंवार तपास अधिकाऱ्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्र, निवेदने पाठवूनही तपासाला गती मिळाली नाही. अखेर प्रसारमाध्यमांनी मुद्दा उचलून धरल्यावर यंत्रणेला जाग आली आणि पोलिसांनी ७ डिसेंबर, २०१७ मध्ये कुरुंदकरला अटक केली. दरम्यानच्या ११ महिन्यात कुरुंदकरला पुरावे नष्ट करण्याची संधी मिळाली. अटकेनंतरही पोलिसांनी त्याला बोलते केले नाही. किंबहुना पोलिसांनी संशयिताच्या सोयीनेच तपास केल्याचा बिद्रे-गोरे कुटुंबीयांचा आरोप आहे. एसीपी संगीता अल्फान्सो यांच्या प्रयत्नामुळे चार आरोपींना अटक झाली. महेश फळणीकर या संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली. पण पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गुन्ह्यातील पुरावे दडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय बिद्रे-गोरे कुटुंबीयांना आहे. प्रसारमाध्यमे आणि अधिवेशनातील चर्चेमुळे काही प्रमाणात पोलिसांनी तपास केल्याचे दाखवले, परंतु हा तपास कोर्टात आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यास पुरेसा नसल्याचे मत बिद्रे-गोरे कुटुंबीयांचे आहे.

अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता प्रकरण आहे तरी काय ?

अश्विनी बिद्रे यांचा घातपात ? अभय कुरुंदकरांच्या घरात सापडले महिलेचे केस, रक्ताचे डाग

तब्बल ‘ दीड ‘ वर्षांपासून ह्या महिला पोलीस अधिकारी गायब : तरीसुद्धा पोलिसांचे सहकार्य नाही

सांगलीतील अनिकेत कोथळेच्या खून प्रकरणाला एक नवीन वळण : नातेवाईकांचा गंभीर आरोप

अनिकेत कोथळेच्या खुनानंतर होता ‘ याचा ‘ नंबर : कामटेचे पुढचे फसलेले टार्गेट

क्रौर्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडत अखेर अश्विनी बिद्रे-गोरे यांची हत्याच : ‘ ह्या ‘ व्यक्तीची कबुली

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा