अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ?

By | September 24, 2017

नोटबंदीतून काळा पैसा बाहेर आल्याचे चित्र निर्माण केले गेले. परंतु प्रत्यक्षात सर्व चलन परत आले. जी.एस.टी. तीव्र विरोध करणाऱ्यांनी सत्तेवर आल्यानंतर तोच कायदा लागू केला. वेगवेगळ्या प्रश्नांवर सत्तेत नसताना कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र म्हणणाऱ्यांनी तीन वर्षांत महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय ते दिसतच आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी सरकारला लगावला.

पुणे येथील ,शिवदर्शन येथील लक्ष्मीमाता मंदिरामध्ये पवार यांच्या उपस्थितीत देवीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. इंधनाचे वाढते दर, निश्चलनीकरण, वस्तू व सेवा कर (जीएसटी) यांबाबत त्यांनी भाष्य केले.

पवार पुढे म्हणाले कि, जगभरात पेट्रोलच्या किमती कमी झाल्या आहेत. जागतिक पातळीवरील किमतीच्या जवळपास देशातील इंधनाची किंमत आणायची, ही एक चांगली संधी भारत सरकारला होती. सर्वसामान्य माणूस महागाईच्या संकटात जाण्यात नोटबंदी आणि जीएसटी या दोन गोष्टींची भर पडली. देशाची अर्थव्यवस्था संकटात आली असून विकासदर नऊवरून पाच टक्क्य़ांवर आला आहे.त्यामुळे या प्रश्नांना तोंड देण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन पर्याय उभा केला पाहिजे. विरोधी लोकांकडून लोक अपेक्षा करत आहेत आणि जनतेच्या अपेक्षा असतात तेव्हा त्यांना निराश करणे योग्य नाही.

राणे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले , राणे यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार असून योग्य वाटेल तो निर्णय त्यांनी घ्यावा. त्याबाबत आणखी काही बोलणे योग्य होणार नाही, असे सांगत पवारांनी राणेंबाबत अधिक भाष्य करण्याचे टाळले.

नोटाबंदी, जीएसटीमुळे देशाचा विकासदर कमी झाला असून बेरोजगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जागतिक बाजारात इंधनाच्या किमती कमी होऊनही देशांतर्गत पेट्रोलचे दर महागच आहेत . या सर्व प्रश्नांबाबत समविचारी पक्षांनी एकत्र येण्याबाबत ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली असून येथून सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल .

??पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा ..शेअर करा ??