मोठी बातमी : सामूहिक हत्या कि आत्महत्या ? एकाच घरात सापडले तब्बल ११ मृतदेह

By | July 1, 2018

11 bodies found breaking news

दिल्लीतल्या बुरारी भागात एका घरात 11 मृतदेह सापडल्यानं संपूर्ण दिल्लीमध्ये खळबळ उडाली आहे.उत्तर दिल्लीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे . प्राथमिक माहितीनुसार, दोन कुटुंबातील 11 जणांनी सामूहिक गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ही नक्की आत्महत्या कि हत्या ? या बद्दल अजूनही पोलिसांकडून काही स्पष्ट सांगितले जात नाहीये त्यामुळे अद्यापही या 11 जणांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे.

एवढ्या मोठ्या संख्येनं आत्महत्या करण्याचं कारण काय असू शकेल याचा पोलीस अंदाज लावत आहे . नवी दिल्लीतल्या संतनगरमधल्या गुरुगोविंद सिंह रुग्णालयासमोरच्या गल्ली नंबर 2 मध्ये ही घटना घडली आहे. मृतांपैकी 10 जणांच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती. तसेच 10 मृतदेह रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत सापडलेत. तर एक मृतदेह जमिनीवर सापडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेल्यांपैकी काहींचे हात बांधण्यात आले होते, तर काहीचे पाय बांधण्यात आले होते. तर काहींच्या तोंडावर पट्टीदेखील बांधली होती. बुरारीच्या ज्या परिसरात हे मृतदेह सापडले आहेत, तिथे लोकांनी मोठी गर्दी केली आहे. आज सकाळीच अशा प्रकारची धक्कादायक घटना समोर आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती ह्या दोन भावांच्या कुटुंबातील असून, मृतांमध्ये 7 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील एक जण प्लायवुडचा धंदा करत होता, तर दुस-याचं किराणा मालाचं दुकान होते . कुटुंबाची आर्थिक स्थिती ठीकठाक होती. मात्र तरी देखील ७ महिला व ४ पुरुष यांचे अशा प्रकारे मृतदेह सापडणे ही धक्कादायक बाब असून पोलीस हत्या कि आत्महत्या याचा कसून शोध घेत आहेत .