विदर्भात बांबू पासून कापडनिर्मिती होणार : बांबूच्या शेतीसाठी स्वतंत्र दालन

By | September 24, 2017

बांबू हे पारंपरिक वापरातील साहित्य असून उत्तम व रोजगार देणारे पीक म्हणून ओळखले जात आहे. या बांबूपासून शर्ट, चादरी, ब्लँकेट आदी वस्त्रे तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालेलीच आहे आहे. विदर्भात लवकरच बांबूपासून कापड निर्मिती केली जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपूर येथे दिली.बांबूच्या शेतीसंदर्भात राज्य सरकार स्वतंत्र दालन निर्माण करून शेतकऱ्यांसाठी त्यात प्रशिक्षणाची सोय केली जाणार आहे.

उद्योजकता रोजगारवाढ यासाठी बांबू कमी खर्चात चांगले उत्पन्न व व्यावसायिक संधी देणारे वनपीक आहे. बांबूपासून मेळघाटमध्ये नुकताच शर्ट तयार करण्यात आला आहे. लवकरच ब्लॅंकेट, चादरी आणि इतर वस्तू तयार केल्या जाणार आहेत. फर्निचरसाठी बाबूंचा मोठय़ा प्रमाणात उपयोग केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांबूची शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र दालन निर्माण केले जाणार आहे. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि ५० लाख लोकांना त्यातून रोजगार मिळेल, असेही गडकरी म्हणाले.

अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.लवकरच राज्यातील समुद्रात वाहत जाणारे पाणी इतर नद्यामध्ये वळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच हाती घेणार आहोत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल. राज्यातील अनेक नद्यांचे पाणी समुद्रात मिळते, त्यामुळे ते वाया जाते. त्याचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. ते पाणी इतर नद्यांकडे वळविल्यास पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.

विदर्भात सध्या ऊसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जात आहे त्यामुळे साखर कारखान्यांना चांगले दिवस आले. शेतकऱ्यांना ऊसाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी माहिती देण्याची गरज आहे. त्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. वसंतदादा इन्स्टिटय़ूटचे केंद्र विदर्भात सुरू करण्यात येणार असून त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पाच्या क्षेत्रात ४५ एकर जागा निश्चित केली आहे. त्या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या इन्स्टिटय़ूटला मंजुरी दिली असल्याचे गडकरी म्हणाले.

??पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा ??