भगवानगडावर होणा-या दसरा मेळाव्याचा वाद ह्या वर्षीही परंपरा राखणार का ?

By | September 24, 2017

भगवानगडावर होणा-या दसरा मेळाव्याचा वाद यंदाही कायम आहे. गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा दसरा मेळाव्याला पूर्वापार विरोध कायम आहे, तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक मात्र दसरा मेळाव्यासाठी ठाम आहेत.

दसरा मेळावा ही लोकभावना आहे. त्यामुळे याबाबत लवकरच आमची भूमिका स्पष्ट करू, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

भगवानगड हा वंचितांना शोषितांना बळ देणारा गड आहे. गेली ३५ वर्षे लोकनेते गोपीनाथ मुंडे गडाचे भक्त म्हणून भगवानगडावर दसरा मेळाव्यात सहभागी व्हायचे, त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी म्हणून तसेच संत भगवानबाबांची भक्त म्हणून आज माझी जबाबदारी वाढली आहे. तर दुसरीकडे गडाचे महंत या सर्वापेक्षा वेगळी भूमिका मांडत आहेत.

त्यामुळे भगवानगड दसरा मेळाव्याबद्दल मी द्विधा मन:स्थितीमध्ये आहे ,माझा निर्णय मी घेईन व लवकरच घोषित करेन, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याशी वैयक्त्तिक आपले काहीही मतभेद नाहीत, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.एका बाजूला श्रद्धाळू तर दुस-या बाजूला श्रद्धास्थान या परिस्थितीत निर्णय घ्यायचा आहे. लवकरच आपली भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.