पुण्याच्या कात्रज घाटात युवकाचा गळा चिरुन खून

By | September 24, 2017

कात्रज घाटात युवकाचा गळा चिरुन खून करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी दुपारी उघडकीला आला. खून झालेल्या युवकाचा चेहरा विद्रुप केलेला असल्याने मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

शनिवारी दुपारी चारच्या सुमारास वनरक्षकांना एका युवकाचा मृतदेह कात्रज घाटातील जंगलात दिसला. त्यांनी त्वरित या घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना दिली. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. युवकाचा गळा तीक्ष्ण शस्त्राने चिरण्यात आला असून त्याचा चेहरा विद्रूप करण्यात आला आहे. खून झालेल्या युवकाची ओळख पटू नये म्हणून हल्लेखोरांनी त्याचा चेहरा विद्रूप केल्याची शक्यता आहे.

प्रथमदर्शनी पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केलाय. युवकाचे वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष दरम्यान आहे. पोलिसांकडून मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून युवकाची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

याप्रकरणी रात्री उशिरा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.